Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत मार्गावर धावणार ५० लोकल; डिसेंबर 2026 पर्यंत मार्ग पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरू

एमयूटीपी-३ अंतर्गत २,७८२ कोटींचा दुहेरी रेल्वे मार्ग; प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती
Panvel Karjat Local Train
Panvel Karjat Local TrainPudhari
Published on: 
Updated on: 

नेरळ: मुंबई आणि नवी मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पनवेल ते कर्जतदरम्यान उभारण्यात येत असलेला नवीन उपनगरीय रेल्वे मार्ग आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे.

डिसेंबर 2026 पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरू असून, त्यावर लोकल सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी वेगाने सुरू केली आहे.

पहिल्या टप्प्यात या मार्गावर दररोज 50 लोकल चालवण्याची योजना असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या नव्या मार्गामुळे कर्जतपर्यंतचा प्रवास अधिक जलद होण्यासोबतच उपनगरीय रेल्वेवरील गर्दी कमी होण्यासही मदत मिळणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अर्थात एमयूटीपी-3 अंतर्गत पनवेल-कर्जतदरम्यान दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 2,782 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. सध्या या प्रकल्पाचे जवळपास 99 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Panvel Karjat Local Train
Namaqua Dove: उरणच्या सिमेंटच्या जंगलात दुर्मीळ पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पनवेल आणि कर्जतदरम्यान पर्यायी उपनगरीय रेल्वे मार्ग उपलब्ध होईल. सध्या या दोन शहरांदरम्यान थेट उपनगरीय रेल्वे जोडणी नसल्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी अधिक वेळ खर्च करावा लागतो. नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर ही अडचण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. मुंबई, नवी मुंबई आणि कर्जतच्या दिशेने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे.

Panvel Karjat Local Train
Alibag Accident: अलिबागमधील दाम्प्त्यावर काळाचा घाला; एकविरा दर्शनाहून परतताना दुचाकी अपघातात मृत्यू

पनवेल ते कर्जतदरम्यान असणार 5 रेल्वे स्थानके

नव्या रेल्वे मार्गावर एकूण 5 स्थानके उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये पनवेल, चिखले, पोयंजे, चौक आणि कर्जत या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांमुळे मार्गावरील विविध भागांतील प्रवाशांना उपनगरीय रेल्वेसेवेचा लाभ घेता येणार आहे.

या मार्गावर प्रवास अधिक सुरळीत होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे. मार्गिकेवर एकूण 3 बोगदे असून त्यांची एकत्रित लांबी 3.164 किलोमीटर आहे. यापैकी वावर्ले बोगदा सर्वांत लांब असून त्याची लांबी 2.625 किलोमीटर आहे. याशिवाय या रेल्वे मार्गावर 5 उड्डाणपूल आणि 16 भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत.

स्थानकांची कामे कुठपर्यंत आली?

या प्रकल्पांतर्गत नवीन पनवेल स्थानक कार्यान्वित झाले आहे. चिखले आणि पोयंजे स्थानकांच्या इमारतींचे बांधकामही पूर्ण झाले आहे. दुसरीकडे, कर्जत स्थानकावरील विविध कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.

कर्जत स्थानकावर फलाट, सर्क्युलेटिंग एरिया, फलाटावरील छताची व्यवस्था, उद्वाहक, सरकते जिने आणि इतर प्रवासी सुविधांची कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता यावा, यासाठी आवश्यक सुविधांची पूर्तता केली जात आहे.

कर्जतपर्यंतचा प्रवास 30 मिनिटांनी कमी

पनवेल-कर्जत नवीन रेल्वे मार्गाचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रवासाच्या वेळेत होणारी बचत. हा मार्ग सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जतदरम्यानचा प्रवास सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे दररोज मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच सध्याच्या उपनगरीय रेल्वे मार्गांवरील गर्दी कमी करण्यासही मदत होणार आहे. कर्जत, भिवपुरी, नेरळ आणि खोपोली परिसरातील हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे. मार्गाच्या प्रत्यक्ष सेवेला सुरुवात होण्याकडे लागले आहे.

डिसेंबर 2026 पर्यंत मार्ग सुरु होणार?

डिसेंबर 2026 पर्यंत पूर्णत्वाकडे जाणारा पनवेल-कर्जत रेल्वे प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरीय वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तांत्रिक चाचण्या आणि अंतिम मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर पहिल्या टप्प्यात 50 लोकल सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे पनवेल, कर्जत आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांचे लक्ष आता या नव्या रेल्वे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news