

पनवेल, पुढारी वृत्तसेवा : महाड येथून गोवंशाची कत्तल करून गोवंशवर्गीय जनावरांचे मांस विक्रीच्या उद्देषाने मुंबई येथे घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या रोखल्या. पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने पळस्पे फाटा येथे नागरिकांच्या मदतीने ही कारवाई केली. यावेळी ४ जणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर ३ जण पसार झाले आहेत.
महाड येथून दोन वाहनांमध्ये अवैधरित्या गोमांसची वाहतूक करणार असल्याची माहिती एका जागरूक नागरिकाला मिळाली. त्याने तत्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पळस्पे चौकी येथे असलेले पोलीस कर्मचारी जगताप व मोकल यांना कळवले. तत्काळ पोलिसांनी पळस्पे पोलीस बिट चौकी समोरील ब्रिजखाली सापळा रचून संशयित वाहने पनवेलच्या दिशेने येताना रोखली. यावेळी वाहनांमध्ये असलेले ७ जण पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यापैकी सलमान शेख (वय 30, रा कुर्ला), फैजल दसुलकर (वय 29, कुर्ला), अमीर खान (वय 42, घाटकोपर), काषीद खान (वय 22, विक्रोळी) या चौघांना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले. तर इतर तिघे जण पळून गेले.
यावेळी पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता गाडीत लाल रंगाचे मोठ्या जनावरांचे गोवंशवर्गीय काळ्या ताडपत्रीत झाकलेले अंदाजे 500 ते 600 किलो मांस व मांस कापण्याचे हत्यार आढळून आले. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.