Panvel Crime : तळोजा कारागृहात खाकीच ठरली तस्कर! शिपायाकडून चरस आणि अंमली गोळ्यांचा साठा जप्त

Drug Case
Drug Case :File Photo
Published on
Updated on

विक्रम बाबर

पनवेल : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कारागृहातील एका शिपायालाच अंमली पदार्थांसह रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय आदित्य शेलार हा तळोजा मध्यवर्ती कारागृहात शिपाई म्हणून कार्यरत असून सोमवारी दुपारी दिवसपाळीची ड्युटी बजावत होता. कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने एका हवालदाराने त्याची तपासणी केली. झडतीदरम्यान त्याच्या खिशात अंमली पदार्थांचा साठा आढळून आला.

तपासणीत शेलारकडून सुमारे ४५.९२ ग्रॅम चरस तसेच २०.५५ ग्रॅम वजनाच्या अंमली गोळ्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थांची अंदाजे किंमत ४७ हजार रुपयांच्या आसपास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कारागृह प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार, हा साठा न्यायबंदी आणि कैद्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कारागृहात आणला जात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार खारघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोजा कारागृहात यापूर्वीही मोबाईल फोन व इतर प्रतिबंधित वस्तू सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, यावेळी कारागृहातील कर्मचाऱ्याच अंमली पदार्थांच्या पुरवठ्यात सहभागी असल्याचे समोर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news