

पनवेल : पनवेल महापालिकेने खारघर, कळंबोली, कामोठे आणि खारघर येथे दैनंदिन बाजार उभारण्याचे ठरवले आहे. यासाठी सिडकाने भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे लवकरच पनवेलकरांना ही सेवा उपलब्ध होणार आहे.
पनवेलमध्ये सध्या तात्पुरत्या स्वरुपात बाजार उपलब्ध आहेत. यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी कायमस्वरुपी बाजार उपलब्ध करून देण्यासाठी हे नियोजन केले आहे. यामुळे पनवेलकरांना बाजारांची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
खारघर प्रभाग अमध्ये सेक्टर 3,4, 6, 11, 12, 15 व 20 मधील एकूण 15 ठिकाणी, कळंबोली प्रभागात सेक्टर 2,2ई, 5ई, 6, 10,12, 14,15 मध्ये 16 ठिकाणी , कामोठे प्रभागात सेक्टर 17 मध्ये 38 ओटे , सेक्टर 21 मध्ये 14 ओटे, सेक्टर 18मध्ये 46 ओटे , सेक्टर 10 मध्ये 14 ओटे अशा पाच ठिकाणी दैनिक बाजार बांधण्यात येणार आहेत. याप्रमाणेच पनवेल प्रभाग ड मध्ये सेक्टर 6, 1 एसई, 2 ई, 3 ई, 4ई, 7 डब्लू, 8डब्लू, 10 डब्लू़ 5ए, 5 मधील 10 ठिकाणी गरजेनूसार ओटेसंख्या असलेले दैनिक बाजार बांधण्यात येणार आहे.
या दैनिक बाजारांसाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देखील मिळाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन पनवेल प्रभागातील नागरिकांच्या सेवेत सर्व सोयी सुविधांनी युक्त असे प्रशस्त असे दैनिक बाजार उपलब्ध होणार आहेत.