

पनवेल ः पुढारी वृत्तसेवा
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे लेनवर पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत 12 जानेवारी रोजी रात्री अडीचच्या सुमारास टेम्पोला कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली.
यातील पिकअप टेम्पो एम एच 14 केक्यू 9246 वरील चालक अल्लाउद्दीन इसाक शेख (वय 28 वर्ष, राहणार भिवंडी) हा त्याच्या ताब्यातील टेम्पो भिवंडी ते महाबळेश्वर घेऊन जात असताना त्यास झोप आल्याने त्याच्या ताब्यातील टेम्पो पुणे लेन किमी 10: 800 येथे पहिल्या लेनवर थांबवले. त्याच्या पाठीमागून आलेली इको स्पोर्ट कारवरील चालक मनीष आनंदा हरणे (वय 30 वर्ष, रा. विरार) हा पहिल्या लेन वरील पिक अप टेम्पोला पाठीमागून जोरदार ठोकर मारल्याने अपघात झाला. या अपघातात आई अनिता आनंद हरणे यांच्या डोक्यात दुखापत झाली. तर वडील आनंद हरि हरणे, भाऊ अक्षय आनंदा हरणे हे देखील जखमी झाले. त्यांना खाजगी अॅम्बुलन्सने एम जी एम हॉस्पिटल, कामोठे येथे रवाना करण्यात आले. अपघाताच्या ठिकाणी महामार्ग पोलीस, पळस्पे मोबाईल वरील स्टाफ, आय आर बी स्टाफ, देवदूत स्टाफ हजर होते.