

पनवेल : दहा तोळे वजनाच्या सोन्याचा हाराचा अपहार केल्याप्रकरणी गौरव दत्तात्रय भेंडे (रा. पनवेल) सौरभ, प्रवीणा सावंत आणि अनोळखी ईसमाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दीपक महाजन याला दीड लाखांची आवश्यकता असल्याने त्याचे शिक्षक अँथोनी नाडर यांनी त्यांच्या पत्नीचा दहा तोळे वजनाचा सोन्याचा हार पावतीसह महाजन यांना दिला व तो गहाण ठेवून येणाऱ्या पैशातून जेवढे आवश्यकता आहे तेवढे ठेव आणि उर्वरित पैसे आणून दे असे सांगितले. महाजन यांनी हार कोणी गहाण ठेवून पैसे देतो का असे त्याचा मित्र गौरव भेंडे यांना फोन करून विचारले.
5 ऑक्टोबर रोजी ओरायन मॉल येथे पोहोचल्यानंतर गौरव, सौरभ, प्रवीणा सावंत आणि अनोळखी ईसम यांच्या ताब्यातील स्विफ्ट गाडीमध्ये ते बसले. यावेळी सोन्याचा हार गौरवकडे दिल्यानंतर त्याने तो हार प्रवीणा सावंत हिच्या ताब्यात दिला व तो तपासण्यासाठी पाचही जण कळंबोली येथील डीसीबी बँकेच्या पुढील लेनवर पोहोचले.
त्यानंतर विश्वासघात करून सोन्याचा हार प्रवीणा सावंत व सौरभ घेऊन गाडीतून खाली उतरले आणि काही वेळाने गौरव देखील त्याच्याकडील काही चेक जमा करण्यासाठी गाडीतून खाली उतरला व अनोळखी इसमाने कारने महाजन यांना पनवेलच्या दिशेला घेऊन जाऊन दिलेला सोन्याचा हार खोटा आहे असे प्रवीणा सावंत हिने त्याला सांगितल्याचे बोलून त्यांना सोडले. मात्र दिलेला हार खोटा आहे असे बोलून त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत व सोन्याचा हार परत केला नाही. त्यामुळे चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.