

पनवेल : शिक्षणाच्या मंदिरातच एका चिमुरडीवर अमानुष वागणूक दिल्याची धक्कादायक घटना पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील अंगणवाडीत घडली आहे. शाळेत जाण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका आईने आपल्या लहान मुलीला अंगणवाडीच्या प्रवेशद्वारातच लाथ मारल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी अंगणवाडीत जाण्यास तयार नसल्याने तिच्या आईचा संयम सुटला. संतापाच्या भरात तिने अंगणवाडीच्या दरवाजातच मुलीला लाथ मारल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिक आणि अंगणवाडी परिसरातील व्यक्तींनाही धक्का बसला.
बालकांच्या संगोपनात प्रेम, समजूतदारपणा आणि संयम आवश्यक असताना अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी मुलांवर होणारी मारहाण चिंतेचा विषय असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत संबंधित प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.