

सुधागड : पाली खोपोली राज्य महामार्गावरील धोकादायक व जीवघेण्या खड्ड्यात नागरिकांनी वृक्षारोपण आंदोलन करून आपला आक्रोश व्यक्त केला. तसेच हातात विविध माहिती लिहिलेले फलक घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले व असंतोष दर्शवला.
पाली सुधागड संघर्ष संस्था व नागरिकांनी पाली शहरातील व पाली खोपोली राज्य महामार्गावरील खड्डे यासंदर्भात अर्ज विनंती व आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष देखील वेधले आहे. मात्र ही समस्या सोडवली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले होते. त्यामुळे पालीतील रस्ते व वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील जीवघेणे खड्डे कायमस्वरूपी न भरल्यास सर्व खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन केले जाईल याबाबत संबंधित प्रशासनाला नागरिक व पाली-सुधागड संघर्ष संस्था यांच्या वतीने निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने पाली नगरपंचायतने लागलीच पालीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. तसेच मोठे खड्डे सिमेंट काँक्रिट द्वारे भरले. मात्र एमएसआरडीसी ने पाली खोपोली राज्य महामार्गावरील खड्डे भरले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी येथे आंदोलन केले.
याने सुद्धा फरक पडला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे नागरिकांनी सांगितले. या संदर्भात माहिती घेण्यासाठी एमएसआरडीसी चे एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच नागरिकांनीही त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनी फोन उचलला नाही. आंदोलन करताना पाली सुधागड संघर्ष संस्थेचे सदस्य व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
पाली शहारात असलेले खड्डे भरण्याचे काम सुरु केले आहे. जे मोठे खड्डे होते त्यांना सिमेंट काँक्रिटने योग्य प्रकारे भरण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांचे समाधान झाले आहे. मात्र पाली खोपोली राज्य महामार्गावर असलेले खड्डे भरण्याचे काम आमच्या अख्त्यारीत येत नाही.
सुलतान बेनसेकर, बांधकाम सभापती, नगरपंचायत पाली