Paddy harvesting | रायगडात भातकापणीच्या कामांना पुन्हा वेग

भातकापणीबरोबरच मळणीसाठी आता यंत्रांचा वापर
Paddy harvesting |
रायगडात भातकापणीच्या कामांना पुन्हा वेग
Published on: 
Updated on: 

रायगड : रायगड जिल्हयात भातकापणीच्या कामाला पुन्हा एकदा वेग आलाय. बेभरवशी पावसामुळे कापणी बरोबरच मळणीची कामे आटोपण्याकडे शेतकर्‍यांचा कल दिसतो आहे. मात्र सध्या मजुरांची वानवा शेतकरयांना मोठया प्रमाणावर भेडसावते आहे. शेतीतील आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाची कास धरीत शेतकरी वर्ग पारंपरिक शेतीला छेद देण्याचा प्रयत्न करीत आहे. भातकापणी बरोबरच मळणीसाठी आता यंत्रांचा वापर केला जावू लागला आहे.

यंदा पावसाने अगदी सुरुवातीपासून चांगली साथ दिल्याने शेतीची कामे वेळेवर आटोपली. त्यामुळे पीकही उत्तम आले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात शेतकर्‍यांनी कापणीला सुरुवात देखील केली. मात्र परतीचा पाऊस आडवा आला. जवळपास 15 दिवस हा पाऊस ठाण मांडून होता. त्यामुळे कापणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली. परतीच्या पावसाने उभ्या पीकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. जवळपास 4 हजार हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसला. पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता परिणामी शेतकरी धास्तावला होता. हळव्या बरोबरच आता गरवी म्हणजे उशिरा होणारे भातपीकदेखील कापणी योग्य झाले आहे.

आता पाऊस पूर्णपणे थांबला आहे. धुके पडायला सुरुवात झाल्याने पाऊस गेल्याची चाहूल शेतकर्‍यांना लागली. त्यामुळे आता पुन्हा एकदा भातकापणीची कामे सुरू झाली आहेत. या कामांसाठी मजुरांची कमतरता भासते आहे. एकमेकांना मदत करून शेतकरी कापणीची कामे करीत आहेत. कापणी केलेली पिके शेतातच वाळत टाकली जातात. त्यात दोन दिवस जातात. दरम्यानच्या काळात आधी कापणी झालेल्या पिकांची मळणी करून निसगनि दिलेले जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्याचा शेतकरयांचा प्रयत्न दिसतो आहे.

भातमळणी करण्यात शेतकरी व्यस्त

शेतीतील आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाची कास धरीत शेतकरी वर्ग पारंपरिक शेतीला छेद देण्याचा प्रयत्न करीत आहे. भातकापणी बरोबरच मळणीसाठी आता यंत्रांचा वापर केला जावू लागला आहे. शेतातच ताडपत्री पसरून यंत्रांच्या सहाययाने भातमळणी करण्यात बरेच शेतकरी व्यस्त आहेत. शेतकर्‍यांच्या मानसिकतेत वेगाने बदल होत असून यंत्रांच्या सहाय्याने कामे उरकण्याकडे कल वाढतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.