

पनवेल ः ठाणे, नवी मुंबई, रायगडमधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 14 नोव्हेंबर रोजी भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः खारघर येथे जाहिर सभेस उपस्थित राहाणार आहेत.
भाजपा सध्या विधानसभा निवडणूकीसाठी अॅक्शन मोडवर असल्याचं दिसून येत आहे. ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील महायूतीच्या सर्व उमेदवारांसाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता ही सभा होणार आहे. निवडणूकीच्या या रणधुमाळीत उमेदवारांसह मतदारांना संबोधित करण्यासाठी या सभेचं आयोजन होत आहे. महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत रंगणार असल्याने सर्वच पक्षातील प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. दरम्यान, पनवेलमधील महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना पनवेलमध्ये जाहिर सभेसाठी आणण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी चार दिवसांत नऊ प्रचारसभांना संबोधित करणार असून, एक रोड शोदेखील करणार आहेत. शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी धुळे आणि नाशिकमधील सभेने पंतप्रधानांच्या महाराष्ट्रातील प्रचार दौर्याला सुरुवात होत आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा कार्यक्रम भाजपने निश्चित केला आहे. धुळे येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजता पंतप्रधानांची पहिली सभा पार पडेल. त्यानंतर दुपारी दोन वाजता नाशिक येथील सभेला पंतप्रधान संबोधित करतील. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत. शनिवारी, 9 तारखेला अकोला आणि नांदेड येथे मोदींची सभा होणार आहे. मंगळवारी, 12 नोव्हेंबर रोजी पुण्यात रोड शो करण्यापूर्वी मोदी हे चिमूर आणि सोलापुरातील सभेला संबोधित करणार आहेत. गुरुवार, 14 नोव्हेंबर रोजी संभाजीनगर, रायगड आणि मुंबईतील प्रचारसभांना ते संबोधित करणार आहेत.