Olive Ridley Sea Turtles : पर्यटनाच्या गजबजाटात ऑलिव्ह रिडले कासवांचा अधिवास धोक्यात

रायगड किनारपट्टीवर घरट्यांची संख्या ९० टक्क्यांनी घटली; संवर्धनासाठी जनजागृतीची गरज
Olive Ridley Sea Turtles
Olive Ridley Sea Turtlespudhari photo
Published on: 
Updated on: 

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

कोकणातील समुद्रकिनारे सध्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले असताना, याच वाळूत अंडी घालण्यासाठी येणाऱ्या दुर्मिळ 'ऑलिव्ह रिडले' सागरी कासवांचा अधिवास मात्र वेगाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धनच्या किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर आढळणारी कासवांची घरटी आता दुर्मिळ झाली असून, गेल्या दशकभरात या नोंदींमध्ये तब्बल ९० टक्क्यांची मोठी घट झाल्याचे पर्यावरणप्रेमींचे निरीक्षण आहे.

कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांचा विणीचा हंगाम साधारणपणे नोव्हेंबरमध्ये सुरू होतो; यंदा मात्र तो ऑक्टोबरमध्येच सुरू झाला. गुहागरमध्ये कासवाचे पहिले घरटे नोंदवले गेले असले, तरी रायगड जिल्ह्याच्या एकाही किनाऱ्यावर अद्याप एकाही घरट्याची नोंद झालेली नाही. रात्री उशिरापर्यंत किनाऱ्यावर चालणाऱ्या पार्ट्या, पर्यटकांचा गोंधळ आणि वाहनांची अनियंत्रित वर्दळ यामुळे कासवांना सुरक्षित जागा मिळणे कठीण झाले आहे.

किनाऱ्यांवरील मोकाट कुत्रे अंडी उकरून खातात किंवा नवजात पिल्लांना भक्ष्य बनवतात. भरतीचे पाणी रोखण्यासाठी किनाऱ्यांवर बांधण्यात आलेले दगडी वा काँक्रीटचे कठडे कासवांच्या वाळूत येण्याच्या नैसर्गिक मार्गात अडथळा ठरत आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये किहीम येथे आढळलेल्या घरट्यानंतर अलिबाग परिसरात नवीन घरटे दिसलेले नाही.

वनविभागकडून जनजागृतीचे प्रयत्न

कासव संवर्धनासाठी वनविभागाचा कांदळवन कक्ष आणि स्थानिक पर्यावरण संस्था संयुक्तपणे काम करत आहेत. किनाऱ्यांवर वाहने नेण्यास बंदी घालणे, कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणे आणि घरट्यांचे संरक्षण करणे याविषयी स्थानिक व पर्यटकांना मार्गदर्शन केले जात आहे. पर्यटन आणि पर्यावरण यांचा योग्य समतोल साधण्यासाठी श्रीवर्धन येथे स्थानिकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कांदळवन उपजीविका कक्षाचे तज्ज्ञ अनिकेत पेर्णुकर यांनी दिली.

५४ किनाऱ्यांवर अधिवास

वनविभागाच्या नोंदीनुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीतील एकूण ५४ सागर किनारी ऑलिव्ह रिडले कासव मादी आपली घरटी करतात. या मधील सर्वाधिक ३० किनारे रत्नागिरी जिल्ह्यात असून त्यामध्ये गुहागर, वेळास, आंजर्ले या तिन किनाऱ्यांवर सर्वाधिक प्रमाण असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० किनारे आहेत तर रायगड जिल्ह्यात ४ किनारे आहेत.

कासवांच्या घरट्यांची घटती नोंद पर्यावरणातील बदलांचे गंभीर संकेत देत आहे. समुद्राच्या पाण्याचे तापमान, सागरी प्रवाह किंवा चक्रीवादळासारखे नैसर्गिक घटक कारणीभूत असले, तरी किनाऱ्यांवर वाढलेली मानवी असुरक्षितता हा सर्वात मोठा धोका आहे.

डॉ. प्रसाद दाभोळकर, वाइल्डलाइफ वॉरियर्स ऑफ अलिबाग

Administrator

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.