

खोपोली : प्रशांत गोपाळे
खालापूर तालुक्यात 19 जुलैला सर्वांचे ह्दय हेलावणारी घटना घडली. रात्री झोपेत जोरदार पावसाच्या सरी कोसळत असताना डोंगराळ भागात इरसाळवाडी गावावर दरड कोसळल्याने येथील अनेक कुटुंबं मातीच्या ढिगार्याखाली गाडली गेली. अनेकांचा बळी गेला. त्यानंतर शासनाने तातडीने मदत कार्य सुरू करून पुनर्वसनाला गती दिली. गेली दोन वर्षात नवीन वसाहत तयार होऊन 44 कुटुंबांना सर्वसोयीयुक्त घरे मिळाली आहेत.
19 जुलै 2023 रोजी ही घटना घडल्यानंतर शासन खडबडून जागे झाल्याने या कुटुंबांना तात्पुरते चौक गावजवळ राहण्याची व्यवस्था व खाण्या पिण्याची व्यवस्था केली. त्यांनतर त्यांना या इरसाळवाडी गावजवळून 5 की मी च्या अंतरावर असणार्या शासनाच्या जागेत कायमची पक्की घरे तयार करून देण्यासाठी राज्य शासनाने आदेश दिल्याने शासकीय यंत्रणा कामाला लागली आणि सिडकोने ही जबाबदारी घेऊन शिर्के कन्ट्रक्शन या बांधकाम कंपनीला घरे बनवून देण्यासाठी ठेका दिल्याने युद्धपातळीवर काम सुरू करून सर्व सोयीयुक्त घरे देऊन पूर्वसन केल्याने इरसाळवाडी पूर्वपदावर आल्याचे चित्र असून इरसाळवाडी खेळू बागडू लागले असल्याचे चित्र या नवीन वसाहतीध्ये आहे.
खालापुरात तालुक्यासह सर्वत्र जोरदार पावसाच्या सरीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना 19 जुलै ची ती काळी रात्र होती. या दिवशी इरसाळवाडी मधील हसती खळती कुटुंबांवर दरड कोसळल्याने मातीच्या ढिगार्याखाली गाडली गेली.
बचवलेली काही मंडळी यांना तात्पुरते चौक गावजवलील एक खाजगी मालकीच्या जागेत तात्पुरते पूर्वसन केले मात्र पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी राज्य शासनाचे मंत्री मंडळाने निर्णय घेतल्याने शासकीय यंत्रणा कामाला लागली तात्कालीन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील तात्कालीन प्रांत अधिकारी अजित नैराळे व तहसीलदार आयुब तांबोळी गटविकास अधिकारी सह सर्वच शासनाचे अधिकारी येथील कुटुंबाचे कायमस्वरूपी पूर्वसन होण्यासाठी कामाला लागले. या ठिकाणी जवळपास 5 की मी च्या अंतरावर असणारे नानिवली गावजवळ जवळपास साडेसहा एकर शासकीय जागेत 44 कुंबाना पक्की घरे बांधून देण्यासाठी पाऊले उचलली त्यानुसार ही जबाबदारी सिडको कडे देण्यात आली आणि शिर्के कन्ट्रक्शन कंपनीला घरे तयार करण्यासाठी बांधकामालाची जबाबदारी दिली आणि युद्धपातळीवर काम सुरू करून प्रत्येक कुटूंबाला साडे तीन गुंठे जागेत सुसज्ज घर तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी ठरवून दिलेल्या जागेत स्वतंत्र परसबाग,24 तास पाणी बाथरूम, आजूबाजूला सुरक्षा भिंत किचन रुम, बेडरूम, हॉल खेळती हवा राहावी यासाठी सलयडिंग खिडक्या बालवाडी, शाळा आणि गुराढोरांसाठी स्वतंत्र शेड देण्यात आले आहेत. त्यामुळे इरसाळवाडी पुन्हा सर्व दुःख पचवून हसती खेळती असल्याचे चित्र या नवीन वसाहती आहे.
इरसाळवाडीचे पूनर्वसन पूर्णपणे झाले आहे. या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली असून सुसज्ज घर आणि पाणी 24 तास, वैद्यकीय सुविधा, त्याच बरोबर अन्य सुविधा सुरू आहेत. शैक्षणिक सुविधेसाठी आणि समाज मंदिर अन्य कामे प्रगतीपथावर असल्याने इरसाळवाडी पुन्हा आहे त्याच स्थितीत येण्याचे मार्गावर आहे. शासन दिलेल्या शब्दाप्रमाणे वागल्याने सर्व कुटुंब शासनाचे आभार व्यक्त करीत आहेत.
- अंकुश वाघ, इरसाळवाडी ग्रामस्थ