कर्जत ः नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वादळी चर्चेनंतर पाणीपट्टी वाढीला मंजुरी मिळाली असून फेब्रुवारी 2026 पासून नव्या दराने पाणीपट्टी आकारली जाणार आहे. अनेक वर्षे थकीत असलेल्या घरपट्टीमध्ये सवलत देऊन शासनाचा अध्यादेशानुसार कोणालाही थकीत घरपट्टीमध्ये सवलत देऊ नये, असा ठरावदेखील नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आला.
नेरळ ग्रामपंचायतीची मालमत्ताधारकांकडे तब्बल 90 लाखांची घरपट्टी थकीत असून जानेवारी 2026 पासून सर्व थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी संकलन करण्याची मोहीम ग्रामपंचायत हाती घेणार आहे. नेरळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा प्रशासक सुजित धनगर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ग्रामसभेत पाणीपट्टी वाढ करण्याबाबत ठराव घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याने मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित होते.
सुरुवातीला थकीत घरपट्टीबद्दल शासनाचा नियम सांगण्यात आला आणि त्यात थकीत घरपट्टी वसुलीसाठी 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय ग्रामसभेत ग्रामस्थ घेऊ शकतात किंवा त्या शासन निर्णयाला ग्रामसभा विरोध करू शकतो, असा नियम आहे. त्यामुळे सभेत हा विषय उपस्थितीत होताच माजी सरपंच सावळाराम जाधव यांनी ठराव घेत कोणालाही घरपट्टीमध्ये सवलत देऊ नये आणि थकीत असलेली सर्व घरपट्टी वसुली करण्यासाठी ठोस नियोजन कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी केली.
नेरळ ग्रामपंचायतीमधील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून देण्यात येणारे पाणी यांची करवाढ करण्याचा विषय ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी मांडला. पाणीपट्टी वाढ करण्यास बहुसंख्य ग्रामस्थांनी विरोध करीत आधी दोनवेळ पुरेसे पाणी द्या आणि नंतरच पाणीपट्टी वाढ करण्यात यावी, अशी भूमिका घेतली होती.मात्र त्यानंतर वाडीवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर सर्वानुमते मासिक पाणीपट्टी 210 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. नेरळ ग्रामपंचायतने 2013 मध्ये 60 रुपये मासिक घरपट्टी 125 प्रति महिना करण्यात आली होती. त्यानंतर 12 वर्षांनी नेरळ गावातील पाणीपट्टीत वाढ करण्यात आली असून फेब्रुवारी 2026 पासून ही वाढ लागू होणार आहे. या कालावधीत सर्व थकीत पाणीपट्टी वसुलीचे नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासक सुजित धनगर यांनी दिले.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ताधारक ग्रामस्थ यांच्याकडून 90 लाखांची थकबाकी आहे. ती सर्व थकबाकी वसूल करावी आणि शासनाच्या निर्णयानुसार सवलत देण्यास ग्रामसभेने विरोध दर्शवणारा ठराव बहुमताने हात उंचावून मंजूर केला असून त्या ठरावाला दिलीप बोरसे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर नेरळ ग्रामपंचायतमधील वीज देयकामधील अतिभार बद्दलचा निर्णय गेली सहा महिने पाठपुरावा करून पूर्ण करून घेणारे प्रशासक सुजित धनगर, ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले आणि ग्रामस्थ अंकुश दाभने यांचा अभिनंदन ठराव ग्रामस्थ संजय मनवे यांनी मांडला.