

खोपोली ः नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी युती, आघाडीसंदर्भात पदाधिकारी व नेतेमंडळींमध्ये हालचाली होत असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माथेरान नगरपरिषदेसाठी अजय सावंत,कर्जत नगरपरिषदेसाठी पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांची थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी जाहीर केले आहे.
खोपोली नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या जागेवरून पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू असल्याने प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी उमेदवार जाहीर न करता नाव गुलदस्त्यात ठेवल्याने खोपोलीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हिरमूस झाली आहे.
नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून कुलदिपक शेंडे यांचे नाव आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केली.कुलदिपक शेंडे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजप ही स्वबळावर नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असणारे असे चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील आणि माजी नगरसेवक व माजी सभापती मंगेश दळवी, व माजी नगरसेविका अश्विनी ताई पाटील यांनी तयारी केली आहे.
भाजपकडून यशवंत साबळे यांच्या नावाची चर्चा आहे मात्र शिवसेना ठाकरे गट,मनसे ,आरपीआय तसेच महायुती सोबत असणारी शेकाप यांनी मात्र नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर नसले तर युती आघाडी वर लक्ष देऊन आहेत.
पक्षांतर्गत असंतोषाची भीती
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे चारही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार बाशिंग बांधून बसलेल्याने इच्छुकांनी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी आपल्याला मिळावी याकरिता पक्ष नेतृत्वाकडे आग्रह धरल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच पक्षांतर्गत असंतोष बाहेर पडू नये म्हणूनच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केला नसल्याची चर्चा आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख चार दिवसांवर असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाची दावेदारी नेमके कोण असेल याकडे खोपोलीकरांचे लक्ष लागून आहे.