

पुढारी ऑनलाईन डेस्क : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक क्षेत्रात गुप्त ड्रग प्रयोगशाळेवर छापा टाकत 46.8 किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले. मुंबईतील भांडुप परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, हे ड्रग एका आरोपीच्या घरात प्लास्टिक कंटेनरमध्ये लपवलेले होते. पोलिस चौकशीत आरोपींनी महाड येथील प्रयोगशाळेत हे ड्रग तयार केल्याची कबुली दिली. एनसीबीने या प्रयोगशाळेवर कारवाई करत संशयास्पद केमिकल जप्त केले आहे. तसेच, या प्रकरणातील मुख्य पुरवठादाराविरुद्ध NDPS कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, तो सध्या जामिनावर सुटला होता.
नशामुक्त भारत या मोहिमेअंतर्गत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार एनसीबीने मोठी कारवाई केली असून, ड्रग्सच्या अवैध व्यापाराविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांनी ड्रग्स संदर्भातील कोणतीही माहिती MANAS - राष्ट्रीय अंमली पदार्थ हेल्पलाइन (1933) वर कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.