

महाड : पुढारी वृत्तसेवा
सुमारे दहा वर्षापूर्वी बिहारमध्ये गुन्हा करून फरार झालेला जहाल नक्षलवादी इसमासला बिहार राज्य पोलिसांच्या विशेष टास्क फोर्स व महाड औद्योगिक वसाहतीच्या पोलीस पथकाने पकडले. या विषयीची माहिती महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
या संबंधित जहाल नक्षलवाद्यावर देशद्रोहाचा व युएपीए गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या संदर्भात अधिकृतपणे माहिती बिहार सरकारकडून देण्यात येईल असे या पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वीच महाडमध्ये बांगलादेशी नागरिकांची धरपकड महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याकडून करण्यात आली होती. यामुळे महाड परिसर हा आता बांगलादेशी व अतिरेक्यांचे आश्रयस्थान होणार का? अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.