

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) २५ डिसेंबर २०२५ रोजी व्यावसायिक विमानसेवा सुरू केल्यापासून ३० लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे. अल्पावधीत साध्य झालेला हा महत्त्वपूर्ण टप्पा भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या आणि भविष्यातील महत्त्वाच्या हवाई केंद्रांपैकी एक म्हणून नवी मुंबई विमानतळाची होत असलेली वाटचाल अधोरेखित करणारा आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या हवाई मार्गांचे जाळे आता ४० हून अधिक ठिकाणांपर्यंत विस्तारले आहे. मुंबई महानगर प्रदेशाला देशातील प्रमुख शहरांशी जोडण्यात विमानतळाची भूमिका अधिक बळकट होत आहे. उदयपूर, जोधपूर, रांची, दरभंगा, गुवाहाटी आणि सिंधुदुर्ग या सहा नव्या देशांतर्गत ठिकाणांचा विमानतळाच्या हवाई मार्गिकांमध्ये समावेश होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी उपलब्ध प्रवासाचे पर्याय आणि हवाई संपर्क आणखी वाढणार आहे.
“३० लाख प्रवाशांचा टप्पा पार करणे हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासप्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील विमानतळाचे वाढते महत्त्व अधोरेखित करणारा हा टप्पा आहे. कार्यक्षम विमानतळ सेवा, विश्वासार्हता आणि प्रवाशांना सुरळीत अनुभव देण्यावर आमचा सातत्याने भर आहे. पश्चिम भारताचे महत्त्वाचे हवाई प्रवेशद्वार म्हणून स्वतःचे स्थान अधिक भक्कम करण्याच्या दिशेने विमानतळाची वाटचाल सुरू आहे,” असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
विमानतळावर व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यापासून हवाई गंतव्यस्थानांची संख्या १३ वरून ४६ पर्यंत वाढली आहे. या कालावधीत विमानतळाने सुमारे २२ हजार ५०० व्यावसायिक विमानफेऱ्या हाताळल्या आहेत. विमानतळ सुरू झाल्यानंतर २०० दिवसांपेक्षा कमी कालावधीत नवी मुंबईहून अबुधाबीला नियोजित आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू करण्यात आली.
हिवाळी वेळापत्रक सुरू होण्यापूर्वी नोव्हेंबर २०२६ मध्ये नव्या विमान कंपन्या आणि हवाई मार्गिकांचा समावेश करून आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काचा आणखी विस्तार करण्याचे विमानतळाचे नियोजन आहे. या नियोजित विस्तारामुळे पश्चिम भारतासाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे आधुनिक आणि सक्षम प्रवेशद्वार म्हणून नवी मुंबई विमानतळाचे स्थान अधिक मजबूत होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी आणि व्यवस्थापन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (NMIAL) मार्फत करण्यात येत आहे. हा विमानतळ अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) आणि महाराष्ट्र शहर व औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) यांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकसित करण्यात आला आहे.
पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर विमानतळावर दरवर्षी ९ कोटी प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता असेल. प्रारंभीच्या टप्प्यात दरवर्षी २ कोटी प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज पायाभूत सुविधांच्या माध्यमातून दरवर्षी ५ लाख मेट्रिक टन मालवाहतुकीची क्षमता विमानतळावर उपलब्ध होणार आहे.