

खारघर ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानसेवा डिसेंबरमध्ये सुरू होईल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकतीच दिली. विमानतळ लवकर सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार अदानी समूह आणि सिडकोने कामाला गती दिली आहे. असे असले तरी काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणे बाकी आहे. संबंधित प्रक्रिया पुढील महिन्याभरात पूर्ण करून येथून लवकरच विमानसेवा सुरु करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.
विमानतळावर प्रवासी किंवा मालवाहतूक उड्डाणे सुरू करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची परवानगी अत्यावश्यक असते. एरोड्रोम परवाना हा धावपट्टीची गुणवत्ता, सुरक्षा उपाययोजना, पायाभूत सुविधा, एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम, अग्निशमन व्यवस्था, सुरक्षा कर्मचारी, कस्टम्स व इमिग्रेशन तसेच पर्यावरणीय मानकांसाठी अधिकृत प्रमाणपत्र असते. पुढील काही दिवसांत हे प्रमाणपत्र प्राप्त होईल.
यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठ पुरावा चालू असून लवकर याची मान्यता प्राप्त होईल.त्यानंतर ‘ऑपरेशनल रेडिनेस ॲण्ड एअरपोर्ट ट्रायल्स’ (ओआरएटी) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान एक ते दीड महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे साधारण डिसेंबरच्या मध्यावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू होईल, असा विश्वास सिंघल यांनी व्यक्त केला. दरम्यान,सध्या विमानतळावरील अंतर्गत कामे पूर्ण करण्यावर यंत्रणेचा भर राहिला आहे.
रस्ते जोडणीचे काम युद्धपातळीवर
नवी मुंबई विमानतळाला आजूबाजूने रस्त्याच्या जोडणीचे काम वेगवान पद्धतीने चालू आहे.विमानतळ ते अटलसेतू ह्या जोडणी मार्गेकीचे काम वेगात चालू असून. या परिसरात असणारे 2 पक्षी स्थळ आहेत याच्यावर कारवाही झाली असून बहुतांशी अडचणी सिडको पूर्ण करत असल्याची माहितीही देण्यात आली.
नामकरणाचा मुद्दा कळीचा
नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण मुद्दा सध्या गाजत असून नुकतेच पनवेल महापालिकेने शहरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे बोर्ड लावेल होते.यावरून चांगलेच घमासान झाले असून आंतरराष्ट्रीय विमानतळ एकीकरण समितीने यावर आक्षेप घेतला होता.