

रायगड : अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध पांढरा कांद्याची लागवड अंतिम टप्प्यात आहे. यावेळी अलिबाग तालुक्यात पांढरा कांद्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून करण्यात येत आहेत. दरवर्षी सुमारे २५० ते ३०० हेक्टरवर लागवड होते ते यावर्षी ५०० हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे मात्र गेली दहा-बारा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.
अलिबागमधील पांढऱ्या कांद्याला पर्यटकांकडूनही पसंती दर्शविली जाते. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, वेश्वी, वाडगाव अशा अनेक गावांतील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात. दोन-अडीच महिन्यांत कांदा तयार झाल्यावर काढणी करून तो सुकवणे, त्याच्या माळा तयार करणे, त्यानंतर तो बाजारात विक्रीसाठी पाठविणे ही प्रक्रिया केली जाते. या कांद्याच्या लागवडीमधून लाखो रुपयांची उलाढाल होते. ही कामे करण्यासाठी स्थानिक महिलांच्या हाताला काम मिळते. रोजगाराचे साधन या कालावधीत सुरू होते.
अलिबाग तालुक्यातील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करण्याच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे शेकडो हातांना आता काम मिळू लागले आहे. २७५ हेक्टर क्षेत्रावर या पिकासाठी वाफे पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे. कांदा उत्पादक शेतकरी कांदा लागवडीच्या कामाला लागले आहेत. वाफे तयार करणे, त्यामध्ये कांद्याच्या रोपांची लागवड करण्याचे काम सुरू झाले आहे. वाफे पद्धतीने लागवडीवर शेतकऱ्यांनी अधिक भर दिल्याचे चित्र आहे. दोन महिन्यानंतर कांदा तयार होऊन जा- नेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात जाण्याची शक्यता आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
यंदा तरी पांढऱ्या कांद्याचे पीक चांगले येईल, अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. हवामानात सातत्याने होणारे बदल यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. धुके आणि ढगाळ हवामानामुळे पिकाची योग्य वाढ झाली नाही. पाती पिवळी पडली. यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होताना दिसत आहे.
दिनेश थळे, कांदा उत्पादक शेतकरी, रायगड