

रेवदंडा : महेंद्र खैरे
चौलच्या महात्मा डोंगरात नागपंचमीला भाविकांच्या श्रध्दा व भक्तीने वाघदेवीची जत्रा प्रतिवर्षी नागपंचमीच्या दिवशी दुपारी दोन ते सायकांळी सहा वाजेपर्यत भरते. चौल, चिचोंटी, आग्राव, वावे, फणसापुर, दिवी-पांरगी, आंदोशी, सराई, आंबेपूर, रेवदंडा आदी परिसरातील गावागावातील भाविक मोठया संख्येने नागपंचमीच्या दिवशी चौलच्या वाघजाई देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात.
परिसरातील गावागावातून दोन ते तिन हजार भाविकांची गर्दी महात्माच्या डोंगरात हमखास आढळते. चौल दक्षिण भागात चौल भोवाळे ते वावे मुख्यः रस्त्यावरील हिंगुळजादेवी मंदिराचे समोरील चौल कातळपाडा गावाहून पुढे भिसारी तळयास वळसा घालून महात्माच्या डोंगराकडे जाण्याचा मार्ग आहे. डोंगराला महात्माचे डोंगर का म्हटले जाते याचे कारण कुठेही लिखित सापडत नाही मात्र प्राचीन काळी तपस्वीची तपोभूमी असल्यानेच या डोंगरास महात्माच्या डोंगर असे म्हटले जात असावे असा कयास येथील ग्रामस्थ करतात. डोंगर माथ्याकडे जाण्यासाठी भिसारी तळयाजवळून पायरस्ता आहे.
दगड, माती, आणि बाजुला कुंपण अशा छोटया गल्लीतून प्रवेश घेवून महात्माच्या डोंगराकडे कुच करता येते. अर्धा कि.मी. डोगराचा पायवाटेचा रस्ता संपल्यावर डोगराचा विर्स्तीर्ण भाग सुरू होतो. डोंगरात छोटयाश्या पायवाटेने मार्गक्रमण करत वाघदेवी मंदिराकडे जाण्याचा रस्ता सुरू होतो. या डोगरावर काही मालकीहक्काच्या जागा आहेत तर मोठा भाग वनक्षेत्रपालाच्या अखत्यारीत येतो.
या ठिकाणी अनेक वर्षापासून काजू वृक्षाची लागवड वनक्षेत्रपालाच्या अखत्यारीत करण्यात आली होती. परंतू दुर्लक्षीत असलेल्या या भागातील काजू व इतर वृक्षाची तोड करण्यात आली आहे. त्यामुळे डोंगरातील झाडे व झुडपे यांचे प्रमाण फारच थोडे आढळते मात्र पावसाळयात हिरवे शालू नेसलेल्या डोंगरातून पायी प्रवास करताना एक वेगळीकता अनुभवास मिळते.
महात्मा डोगरात वाघदेवीच्या मंदिराकडे जात असताना सुरूवातीला भाविकांचे श्रध्दा व भक्ती असलेले नागदेवतेचे स्थान आहे.परंतू हे स्थान मालकी हक्कात येत असल्याने येथील नागदेवतेच्या स्थानाची निगा राखली जात नाही व त्यामुळे नागदेवतेच्या या स्थानाभोवती झाडे व झुडपे यांचे साग्राज्य दिसते. मात्र प्रतिवर्षी भाविक या स्थानाची स्वच्छता करून झाडे झुडपे हटवितात. या स्थानाल नागकडा असे म्हटले जाते. दरवर्षी या नागकडावरील नागदेवतेचे दर्शन भाविक घेवूनच पुढे महात्माच्या डोंगरातील वाघदेवीच्या दर्शनासाठी जात असतात.
नागपंचमीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी येथे नागदेवतेच्या दर्शनासाठी होते. या नागदेवतेचे दर्शन घेवून पुढे सरकल्यावर काही अंतरावर पाषाणाच्या पादुका कोरलेल्या तीन चौकोनी शिला आढळतात. या शिलावर श्री राम असे कोरलेले आहे, चौल कातळपाडा येथील ग्रामस्थ चंद्रकांत थळे यांनी मोठया भक्तीने या स्थळाची निगरानी करून सुयोग्य ठिकाणी ठेवल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येतो. येथूनच डोंगरमाथ्याकडे वसलेल्या वाघदेवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. यावेळी डोंगरमाथ्यावरून चोहोकडे दुरवर नजर फिरवल्यावर कुंडलिका समुद्रखाडीकडे विलोभनिय सृष्टी सौंदर्य पहावयास मिळते.
पूर्वपारंपरिकतेने चौलच्या महात्मा डोंगरात नागपंचमीला भाविकांच्या श्रध्दा व भक्तीने वाघदेवीची जत्रा प्रतिवर्षी नागपंचमीच्या दिवशी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भरते. चौल, चिचोंटी, आग्राव, वावे, फणसापूर, दिवी-पारंगी, आंदोशी, सराई, आंबेपुर, रेवदंडा आदी परिसरातील गावागावातील भाविक मोठया संख्येने नागपंचमीच्या दिवशी चौलच्या वाघजाई देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात. परिसरातील गावागावातून दोन ते तिन हजार भाविकांची गर्दी महात्माच्या डोंगरात हमखास आढळते.