महाड : धारदार हत्याराने वार करून एका इसमाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी महाड तालुक्यात उघडकीस आली असून याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गापासून एक ते दीड किलोमीटर आत चांढवे बुद्रुक येथील जनावरांच्या गोठ्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर अर्जुन भाऊ शेडगे या इसमाचा मृतदेह आढळून आल्याची खबर गुरूवार २४ ऑक्टोबर रोजी पोलिसांना मिळाली. या घटनेमध्ये मृत इसमाच्या डोक्यावर, कानावर कोणत्यातरी धारदार हत्याराने वार केले असल्याचे निष्पन्न झाले होते.
ही हत्या कोणी व का केली, हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.