

Khopoli KP Waterfall Rescue Operation
खोपोली : खोपोली येथील सुप्रसिध्द के. पी. वॉटरफॉल येथील धोकादायक ठिकाणी अडकलेल्या मुंबईतील पर्यटकाची सुखरूप सुटका करण्यात यशवंती हायकर्सच्या पथकाला यश आले. आज (दि. १०) अंधेरी (पूर्व), मुंबई येथील प्रियांशू गेडाम (वय २०) हा तरुण खोपोली येथे एकटाच पर्यटनासाठी आला होता. यावेळी ही घटना घडली.
के. पी. वॉटरफॉल येथे जाणारा रस्ता खडतर आहे. खडी चढाई, डोंगर उतारावर वेगाने वाहणारे ओहोळ आणि निसरड्या पायवाटेने तिथे जावे लागते. नवख्या माणसाने एकट्याने जाण्याचे धाडस जीवावर बेतू शकते. प्रियांशू रस्ता भरकटला. आणि अत्यंत धोकादायक अशा ठिकाणी तो अडकून पडला. प्रसंगावधान दाखवत त्याने एमएमआरसी मदत कक्षामध्ये समन्वयक राहुल मेश्राम यांना मदतीसाठी फोन केला.
राहुल मेश्राम यांनी यशवंती हायकर्सच्या पद्माकर गायकवाड यांना फोन करून माहिती दिली.त्यानंतर यशवंतीचे पथक पद्माकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाले. शोध पथक काही मिनिटांतच प्रियांशू पर्यंत पोहोचले आणि अत्यंत धोकादायक ठिकाणी अडकलेल्या प्रियांशूची सुखरूप सुटका करून त्याला खोपोली येथे घेऊन आले. या मोहिमेत यशवंती हायकर्सचे पद्माकर गायकवाड, प्रणित गावंड, निखिल गुरव, अभिजित देशमुख, अजय फाळे, अतुल तेलंगे, शुभम पाटील, कुणाल पाटील आदीने सहभाग घेतला.