

प्रशांत गोपाळे
खोपोली: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट जवळ शनिवारी (दि. २१) सकाळी अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने दोन अपघात घडले. यामध्ये ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चार जण जखमी झाले आहेत.
सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास खोपोली एक्झिटजवळ पहिला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक ट्रक एक्झिटवरील पुलाच्या उजव्या बाजूला धडकला. यामध्ये ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून, त्याला खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासातच साडेनऊच्या सुमारास दुसरा भीषण अपघात घडला. पुण्याहून मुंबईकडे जाणारा ट्रेलर क्र. टीजी-०८ एक्स ४२०९ खोपोली बाह्यमार्गाजवळ आला असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने पुढे जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रक महामार्गावरच उलटला, तर ट्रेलरच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात ट्रेलर चालक सिद्धार्थ राजा (वय २७, रा. उत्तर प्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रेलरचा क्लिनर फरशाद हुसैन खान (रा. उत्तर प्रदेश) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी नवी मुंबईतील कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तसेच, अपघातग्रस्त ट्रकमधील चालक गुरुनाथ लक्ष्मण खापरे (वय ३८) आणि क्लिनर शरणाप्पा कट्टप्पा वस्ते (वय ३२, दोघे रा. कर्नाटक) हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सलग दोन अपघातांमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि देवदूत यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.