

Borghat gas tanker brake failure
खोपोली : कोचीहून गुजरातकडे 21 टन प्रोपिलीन गॅस घेऊन जाणाऱ्या टँकरचा सोमवारी (दि. २३) सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाट परिसरात अपघात झाला. बोरघाट पोलीस टॅपजवळ उतारावर टँकरचे ब्रेक अचानक निकामी झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तातडीने निर्णय घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या आरसीसी रिटेनिंग वॉलला टँकर धडकवून वेग आटोक्यात आणला. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस, आयआरबीची पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणेची अग्निशमन दल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, हेल्प फाउंडेशनची टीम तसेच अन्य आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
हेल्प फाउंडेशनचे रासायनिक तज्ज्ञ धनंजय गीध यांनी टँकरची तांत्रिक स्थिती, गॅसचा दाब आणि गळतीचा संभाव्य धोका यांची तपासणी करून सुरक्षिततेची खात्री केली. त्यानंतर क्रेन व पुलरच्या साहाय्याने टँकर सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील मोकळ्या जागेत हलविण्यात आला. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि महामार्ग वाहतूक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
आरटीओ अधिकारी रावते यांनी वाहनाची तांत्रिक तपासणी केली असून या घटनेची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. टँकर ओढणारे वाहन पूर्णपणे निकामी झाले असून दुसऱ्या वाहनाच्या मदतीने टँकर पुढे गुजरातकडे रवाना करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रोपिलीन गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात याच मार्गावर झाला होता. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नव्हती; मात्र तब्बल 32 तास वाहतूक कोंडी निर्माण होऊन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. ताज्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
उतारावर ब्रेक फेल झाल्यानंतर वाहन पूर्णपणे अनियंत्रित झाले असते, तर मोठ्या प्रमाणात जीवित व पर्यावरणीय हानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे धोकादायक रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी, नियमित फिटनेस चाचण्या आणि संबंधित कंपन्यांनी विशेष सुरक्षा उपाययोजना राबविणे अत्यावश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे.