

पेण :स्वप्नील पाटील
मुंबई- गोवा महामार्गावर सुरू असणाऱ्या कासवगतीच्या कामाने आधीच आधीच अपुऱ्या असणाऱ्या कामाबाबत प्रवासी आणि वाहन चालक हैराण झालेले असतानाच आता याच वाहन चालकांना लवकरच टोलनाक्यावर महामार्गाचे कर देऊन खिशाला आर्थिक कात्री लावावी लागणार आहे.
रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचे काम एक दशक उलटून गेला तरी आजही त्या कामाला पूर्णत्वास जाण्यास यश प्राप्त झालेले नाही.अगदी न्यायालयाच्या प्रकरणांप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तारीख पे तारीख देऊन देखील या तारखा संपत नसल्याने शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात त्याप्रमाणे शहाण्या प्रवाशाने या महामार्गावरून प्रवास करू नये अशा प्रकारची अवस्था या महामार्गाची झालेली असतानाच आज कोकणातील प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील खारपाडा येथे टोलनाका उभारण्याची लगीनघाई राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाच्या माध्यमातून केली जात असल्याने या निर्णयाबाबत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
एवढेच नव्हे तर रायगड लावण्यात आलेल्या हिंदी भाषिक फलकांवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून सदरचे फलक मराठीत करून रस्त्यावरील रखडलेली कामे, प्रस्तावित टोलवसुली यासह पेण तालुक्यातील वाशी नाका ते उंबर्डे फाटा दरम्यानच्या धोकादायक अंतर्गत रस्त्याची तात्काळ दुरुस्त करावी अन्यथा शिवसेना उग्र आंदोलन करेल असा आक्रमक पवित्रा देखील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी नॅशनल हायवेचे प्रकल्प संचालक तथा कार्यकारी अभियंता रविंद्र इंगोले यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.
महामार्गाचे काम अद्याप अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असून महामार्गाच्या कामासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही येथील साईट पट्ट्या उड्डाणपूल, अंडरपास, ड्रेनेज व्यवस्था आणि इतरही मूलभूत सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे अपूर्ण असलेले रस्ते, खड्डे, धुळीचे प्रदूषण आणि चुकीच्या नियोजनामुळे अनेकदा अपघात घडत आहेत.
ठाकरे सेना आक्रमक
या टोलनाक्याच्या चुकीच्या निर्णयाबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून महामार्गावर मराठीमध्ये फलक लावण्यासह रायगड जिल्ह्यातील एम एच शुन्य सहा नोंदणी असणाऱ्या गाड्यांना टोलनाक्यावरील करात माफी मिळावी अशा प्रकारचे निवेदन शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे.
खारपाडा येथे 15 मे रोजी पासून सुरू करण्यात येणारा टोलनाका हा सद्यस्थितीला फक्त तीन महिन्यांसाठी सुरू करण्यात येणार असून शिवसेनेच्या माध्यमातून आमच्याकडे टोलमाफी तसेच इतर गोष्टींबाबत निवेदन आले आहे, मात्र याबाबतचा जो काही निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होईल त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या निवेदनातील मागण्यांचा नक्कीच विचार करू आणि त्यांचे समाधान करू.
राजेश कुलकर्णी, व्यवस्थापक - खारपाडा टोलनार्का