

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम यावर्षी अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरूवारी (दि.२०) महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केला. तसेच मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामे पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावर टोल वसुली केली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील महायुतीच्या स्थापनेनंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज (गुरूवारी) सकाळपासून दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी पनवेल येथून झाल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी महाड येथे शासकीय विश्रामगृहात आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी नामदार भरत शेठ गोगावले व संबंधित विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम विलंबाने होत असल्याचे मान्य करून इंदापूर व माणगाव येथील बायपास संदर्भात नव्याने वर्क ऑर्डरकरिता टेंडर प्रोसेस फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट केले. तसेच आगामी पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिल्याची त्यांनी माहिती दिली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये काही ठेकेदारांकडून करण्यात आलेल्या चुका व दुर्लक्ष बाबत व निकृष्ट दर्जाबाबत विभागाकडून त्यांना कायमस्वरूपी राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ब्लॅकलिस्ट करण्याबाबतचा विचार केला जात असून याकरता त्यांचे रेकॉर्ड तयार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
महाड मधील एका राष्ट्रीय महामार्गाच्या काम करणाऱ्या ठेकेदाराकडे बांगलादेशी नागरिक आढळून आले होते. यासंदर्भात संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाई करणार का? अशी विचारणा केली असता आपल्या विभागांतर्गत नाही पण पोलीस खात्याला या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले जातील, असे त्यांनी सांगितले. मुंबई येथील टोलमधून लहान गाड्यांना वगळण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार का? अशी विचारणा केली असता या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र शासनाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.