

माणगाव : कमलाकर होवाळ
मुंबई-गोवा महामार्गाचे काम हे राज्यातील सर्वात मोठे अपयश ठरले आहे, असे स्पष्टपणे सांगावे लागते. सतरा वर्षे लोटूनही हा महामार्ग पूर्ण झालेला नाही, हे केवळ शासनाच्या आणि राज्यकर्त्यांच्या निष्क्रियतेचे, उदासीनतेचे आणि दुजाभावाचे जिवंत उदाहरण आहे. नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी या महामार्गाची पाहणी केली. पाहणी करून गेले, काही आदेश झाले आणि त्यानंतर कागदोपत्री हालचाली सुरू झाल्या. परंतु प्रत्यक्षात कामाचा वेग अद्यापही तोकडाच आहे.
गणेशोत्सव उंबरठ्यावर असताना माणगाव व इंदापूर शहरातील अपूर्ण बायपास रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी टळणार नसल्याचे चित्र स्पष्ट आहे. 17 वर्षाचा प्रवासानंतरही राज्यकर्त्यांनी महामार्गावर आश्वासनाचे डोंगरच दाखवले आहेत त्यामुळे कोकणवासीय, प्रवासी, पर्यटक, नागरिकात प्रचंड प्रमाणात चिड निर्माण होत आहे.
लाखो गणेशभक्त या महामार्गाचा वापर करून कोकणात जात असतात. त्यांना वारंवार अडचणींना, खड्ड्यांना, तासन् तास लागणार्या कोंडीला सामोरे जावे लागते, याबद्दल सरकारला कसलीच खंत नाही, हे पाहून संताप अनावर होतो. विदर्भात जाणारा हा समृद्धी महामार्ग हा प्रकल्प राज्यकर्त्यांनी महत्त्वाकांक्षी म्हणून गाजवला. तिथे जलदगतीने कामे पूर्ण झाली, उद्घाटन सोहळे झाले, श्रेय लाटले गेले. मग मुंबई-गोवा महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नाही का ? कोकणातील जनतेचे प्रश्न, त्यांचे जीव, त्यांचा प्रवास याला काहीही किंमत नाही का? हा स्पष्ट राज्यकर्त्यांनी दाखवलेला दुजाभाव आहे.
शासन आणि संबंधित विभागांनी हा महामार्ग वर्षानुवर्षे रखडवत ठेवल्यामुळे अपघातांची संख्या वाढली, प्रवाशांचा प्रवास त्रासदायक झाला, तर व्यावसायिकांनाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. कोकणची माणसं जरी साधी भोळी म्हटलं जात असली तरी त्यांना शासन आणि राज्यकर्त्यांनी हलक्यात घेऊ नये त्यांच्या उद्रेकाची शासनानी वाट पाहू नये, एक दिवस तीच माणसे काळ होऊन राज्यकर्तेच्या मागे लागतील हे मात्र नक्की आहे. अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून बोलताना व्यक्त होत आहे.
महामार्गावर अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. खड्डे एवढे वाढले आहेत की, त्यातून प्रवास करणे ही जीवघेणी धडपड ठरते. खड्ड्यांना भरून काढण्याऐवजी ठेकेदार आणि विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत बसले आहेत. ही स्थिती म्हणजे शासनाच्या उदासीनतेचा कळसच म्हणावा लागेल. शासनाने तत्काळ गांभीर्याने लक्ष घालून हा महामार्ग पूर्णत्वास नेणे ही वेळेची गरज आहे. अन्यथा प्रत्येक गणेशोत्सव, प्रत्येक सुट्टी, प्रत्येक हंगाम याच त्रासदायक चित्राची पुनरावृत्ती करत राहील.
राज्यकर्त्यांनी जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. कोकणातील जनता विचारते आहे - मुंबई-गोवा महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नाही का ? या प्रश्नाचे उत्तर देणे आणि काम तातडीने पूर्ण करणे हीच खरी जबाबदारी सत्ताधार्यांची आहे. हेच सत्ताधारी आपसातील अंतर्गत वादात गुरफटले गेले आहेत. राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे मुंबई गोवा महामार्गाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही.
कोकणातील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक आणि भावनिक बंधांनी जोडलेला उत्सव आहे. या काळात लाखो भाविक आपल्या गावी जातात. पण प्रत्येक वेळी त्यांना अपूर्ण महामार्गामुळे प्रचंड यातना भोगाव्या लागतात. इतक्या वर्षांचा विलंब, वारंवार होणार्या उद्घाटनाच्या गाजावाजा, अपूर्ण बायपास आणि खराब नियोजनामुळे कोकणातील जनतेच्या भावना वारंवार दुखावल्या जात आहेत.