

महाड ः श्रीकृष्ण बाळ
मागील 14 वर्षापासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामांची नियोजनबद्ध माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाने जनतेसाठी जाहीर करावी अशी मागणी या मार्गावरील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच मुंबई गोवा कोकण महामार्गाच्या पूर्णत्वे संदर्भात येणार्या अडचणींवर आपली तीव्र नाराजी याआधीच व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर मागील 14 वर्षापासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या पूर्णत्वेसाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग कोणत्या पद्धतीने ही कामे पूर्ण करणार आहे हे त्यांनी जनतेच्या हितास्तव जाहीर करावे अशी मागणी कोकणवासीय प्रवासी संघाकडून केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गणेशोत्सवापूर्वी केलेल्या कोकण दौर्या दरम्यान महामार्गाच्या सुरू असलेल्या प्रलंबित कामांचा आढावा घेऊन महाड येथील बैठकीदरम्यान डिसेंबर अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होतील अशी सूचना संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांना दिल्या होत्या.
यासंदर्भात विभागीय अधिकार्यांनी दिलेल्या विविध माहितीनुसार काही कामे तांत्रिक अडचणी उत्सव विलंबाने झाल्याचे मान्य करण्यात आले होते. शासकीय अधिकार्यांनी कोकणवासियांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असे स्पष्ट निर्देश अधिकार्यांना व ठेकेदार यांना यापूर्वी अनेक वेळा देऊन देखील कामे पूर्णत्वास न गेल्याबद्दल कोकणवासीय नागरिक तथा प्रत्यक्ष मंत्री महोदयांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील या संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत कामे अधिक गतीने व्हावी असे स्पष्ट निर्देश दिले होते.
लोकप्रतिनिधी व मंत्री महोदयांकडून गेल्या पाच वर्षात प्रतिवर्षी या कामांच्या पूर्ततेच्या तारखा घोषित करण्यात आल्या होत्या याची आठवण आता कोकणवासीय शासकीय अधिकारी व संबंधितांना उघडपणे बोलून दाखवीत आहेत. नागरिकांचा असलेला रोष नाराजी संताप परिवर्तित होऊ नये हे लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रलंबित असलेल्या कामांच्या ठिकाणी कामे पूर्ण कधी होतील यासंबंधीचे फलक तारीख वार लावावे अशी मागणी कोकणवासीय प्रवासी संघाकडून करण्यात येत आहे.
अनेक विभागात अपूर्ण कामे
कोलाड,नागोठणे, इंदापूर व माणगाव येथील बायपासची कामे महाड उपविभाग हद्दीतील सर्विस रोड नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती व प्रत्यक्ष कोकणात चिपळूण नंतरच्या रत्नागिरी पर्यंत कामांची पूर्तता अद्याप व्हावयाची बाकी असल्याचे समजते.