

विश्वास निकम
कोलाड : दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळे आणि सलग शनिवार-रविवारची सुट्टी जोडून आल्याने कोकणात आलेल्या असंख्य पर्यटकांनी परतीचा प्रवास सुरू केला. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडजवळ 'खांब' या ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने प्रवाशांना भयंकर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासन तास अडकून पडल्यामुळे प्रवाशी वर्ग खूप संतप्त झाला आहे. "या वाहतूक कोंडीतून आमची सुटका कधी होणार?" असा प्रश्न ते विचारत आहेत.
दिवाळीच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर राज्यांतून अनेक पर्यटक कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत कोकणातील सुंदर पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे आणि गडकिल्ले पाहण्यासाठी आले होते. सुट्टीचा आनंद लुटून झाल्यावर हे सर्वजण एसटी बस, खासगी गाड्या आणि इतर वाहनांनी आपापल्या घरी परतत होते. परंतु मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग-६६ वरील चौपदरीकरणाचे काम गेल्या १८ वर्षांपासून सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी या कामाला वेग आला होता, पण मतदान झाल्यावर काम पुन्हा थंड पडले आहे. आता रस्त्यावर जेमतेम चार-पाच मजूर काम करत असल्याचे चित्र आहे. हे काम केवळ निवडणुकीपुरतेच होते का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या अतिशय संथ गतीने चाललेल्या कामामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड-खांब तसेच माणगाव आणि इंदापूर येथे ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच परतीच्या जोरदार पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे या खराब रस्त्यातून मार्ग काढायला खूप वेळ लागत होता आणि वाहतुकीची मोठी कोंडी झाली. यामुळे प्रवाशांना अनेक तास गाडीत अडकून राहावे लागले.