Raigad news: गणेशभक्तांसाठी लालपरी सज्ज! मुंबईहून कोकण प्रवास होणार सोयीस्कर...लातूरहून २०० लालपरी पनवेलमध्ये दखल

MSRTC Lalpari Ganesh Special Buses: कोकणात गणेशोत्सवाला प्रचंड महत्त्व आहे. प्रत्येक घराघरात बाप्पाची प्रतिष्ठापना होत असल्याने या दिवसांत कोकणात आप्तस्वकीयांसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबई–पुण्यासारख्या शहरांतून लाखोंच्या संख्येने प्रवासी गावी जातात
Raigad news
Raigad newsPudhari Photo
Published on
Updated on

विक्रम बाबर

पनवेल : गणेशोत्सव म्हटलं की, कोकणात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढते. आपल्या गावी बाप्पाच्या दर्शनासाठी, कौटुंबिक भेटीसाठी आणि सणाचा आनंद लुटण्यासाठी हजारो लोक मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा शहरांतून कोकणाकडे धाव घेतात. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रवासात तिकीटांची टंचाई, गाड्यांची गर्दी, वाहतुकीचा ताण यामुळे प्रवास त्रासदायक होतो.

या पार्श्वभूमीवर यंदा राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) गणेशभक्तांचा प्रवास सुकर करण्यासाठी विशेष पावले उचलली आहेत. लातूर जिल्ह्यातून तब्बल 200 लालपरी बस मुंबईत दाखल झाल्या असून या उपक्रमामुळे यंदाचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे.

शनिवारी संध्याकाळपासून या लालपरी बस मुंबईत दाखल होऊ लागल्या. मुंबईत प्रवेश केल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सर्व बसेस नवी मुंबई विमानतळाच्या शेजारील रोड वरील उलवे–करंजाडे रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत सुमारे 200 बस येथे पोहोचल्या. या बसचा आवाज, प्रवाशांच्या गर्दीची लगबग आणि बस स्थानकावरील हालचालींनी परिसरात उत्सवी वातावरण तयार झाले आहे.

या विशेष नियोजनाची जबाबदारी पनवेल डेपो व्यवस्थापक ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांना विद्याविहार डेपोचे अधिकारी मदतीसाठी तैनात आहेत. या प्रचंड प्रमाणावर आलेल्या बसेस, त्यांचे चालक आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन, प्रवाशांची सोय यासाठी मोठ्या प्रमाणावर समन्वयाची गरज असते. चालक व कर्मचाऱ्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था पनवेल डेपोमार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे कामकाज कोणत्याही अडचणीशिवाय पार पडणार आहे.

ग्रुप बुकिंगवर आधारित या विशेष बसेस रविवारी सकाळपासून मुंबईतील विविध उपनगरांमध्ये जाऊन प्रवाशांना घेऊन कोकणाच्या दिशेने धाव घेतील. यामुळे दादर, ठाणे, कल्याण, वाशी, पनवेल यांसारख्या गर्दीच्या भागातील प्रवाशांना थेट आपल्या भागात बस मिळणार आहे. परिणामी गणेशभक्तांना तासन्तास प्रवास करून मुख्य बसस्थानक गाठण्याची गरज भासणार नाही. त्यांच्या सोयीसाठी जवळच्या ठिकाणाहूनच बस मिळणार असल्याने प्रवासाचा ताण कमी होणार आहे.

कोकणात गणेशोत्सवाला प्रचंड महत्त्व आहे. प्रत्येक घराघरात बाप्पाची प्रतिष्ठापना होत असल्याने या दिवसांत कोकणात आप्तस्वकीयांसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबई–पुण्यासारख्या शहरांतून लाखोंच्या संख्येने प्रवासी गावी जातात. त्यामुळे रेल्वेची तिकिटे काही मिनिटांत संपतात, खाजगी वाहतुकीचे दर गगनाला भिडतात आणि महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. यावर्षी एसटी महामंडळाने उचललेले हे विशेष पाऊल या सर्व समस्यांवर काही प्रमाणात तोडगा ठरणार आहे.

लातूरहून आलेल्या या बसेस मुंबईत दाखल करण्यामागे नियोजनपूर्वक विचार करण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमधून कोकणात जाणारे प्रवासी सर्वाधिक असल्याने, प्रवासाचा ताण कमी करणे आणि प्रवाशांना थेट त्यांच्या परिसरातूनच सोयीस्कर प्रवास देता यावा हा हेतू यामागे आहे. नवी मुंबईला केंद्र मानून केलेले हे नियोजन पहिल्यांदाच राबविण्यात आले असून, याचा लाभ हजारो गणेशभक्तांना मिळणार आहे.

पनवेल परिसर हा कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. त्यामुळे बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी येथे चालक-कर्मचारी यांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या जेवणाखाण्याची व राहण्याची जबाबदारी देखील पनवेल डेपोने घेतली आहे. गणेशोत्सव काळात रात्री-दिवस बसफेऱ्या होणार असल्याने चालकांच्या विश्रांतीसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news