

पेण शहर ः स्वप्नील पाटील
प्रवाशांचे गरिबरथ म्हणून ओळखल्या जाणार्या एसटी म्हणजेच लालपरीला नुकत्याच झालेल्या रक्षाबंधनाच्या जादा गाड्यांमार्फत जवळपास सव्वादोन कोटी रुपयांची ओवाळणी म्हणजेच उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर या चार दिवसातील जादा गाड्यांच्या मार्फत साडेपाच लाख लाडक्या बहिणींनी लाडक्या भाऊरायला राखी बांधण्यासाठी प्रवास केला आहे.
अगदी खेडोपाड्यात शेवटपर्यंत पोहोचणार्या आणि गरिबाच्या खिशाला परवडणार्या एसटी कडे पाहिले जाते. या एसटी महामंडळाचे कोणताही सण उत्सव किंवा एखादी यात्रा किंवा इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रवाशांना सवलतीमध्ये सेवा देण्यात अग्रेसर असते. त्यातच महिलांसाठी तिकीट दरात पन्नास टक्के सवलत देऊन महिला प्रवाशांची मने जिंकलेली असतानाच आता नुकत्याच झालेल्या नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा साठी अगदी त्यांच्या परतीच्या प्रवासा पर्यंत बहिणींची प्रवास करताना गैरसोय होऊ नये यासाठी 40 जादा गाड्या आणि 128 जादा फेर्या आयोजित केल्या होत्या.
त्याचा पुरेपूर लाभ या बहिणींनी घेऊन 5 लाख 55 हजार 040 बहिणींच्या माध्यमातून एसटीला म्हणजेच लालपरीला 2 कोटी 17 लाख 48 हजार 222 रुपयांची ओवाळणी म्हणजेच उत्पन्न प्राप्त झाले आहे. हे उत्पन्न प्राप्त करत असताना लालपरीने या चार दिवसात जादा गाड्यांच्या मार्फत 5 लाख 43 हजार 886 किलोमीटर प्रवास केला आहे हे देखील विसरून चालणार नाही.
नारळी पौर्णिमा आणि त्यालाच लागून आलेली राखी पौर्णिमा तसेच पुढे रविवारचा दिवस असल्याने सोमवारपर्यंत हे सलग चार दिवस आपल्या भाऊरायला राखी बांधायला जाणार्या बहिणींची गैरसोय होऊ नये यासाठी रायगड विभागाने जादा गाड्यांचे आयोजन केले होते, त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतला असून आमच्या लालपरीला देखील जवळपास सव्वादोन लाखांची ओवाळणी म्हणजेच उत्पन्न प्राप्त झाले आहे.
दीपक घोडे, विभाग नियंत्रक - रायगड