

खांब (रायगड) : रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यातील 734 गावांना केंद्र सरकारकडून वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र शेतकर्यांचा वाढता विरोध लक्षात घेता याबाबत राज्यसभेत मुद्दा उपस्थित करुन हा झोन उठविण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही खासदार धैर्यशील पाटील यांनी दिली आहे.
रोहा तालुक्यातील तलाठी सजा चिल्हे हद्दीतील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवळी या ग्रामस्थानी धैर्यशील पाटील यांना रविवारी (दि.10) त्यांच्या पेण येथील निवासस्थानी भेटून या हरकतीचे निवेदन दिले. यावेळी पाटील यांनी याबाबत मी सदैव शेतकर्यांच्या मागे ठाम आहे याबाबत पुरेपूर प्रयत्न करणार तसेच सुरू असलेल्या संसद राज्यसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणारच असल्याचे सुचित केले.
गाडगीळ समितीने पर्यावरण संदर्भात दिलेला अहवाल आणि याबाबतची अधिसूचना काही अटी आणि काही शिथिलता याची अधिक माहिती तसेच त्यानंतर पुन्हा कस्तुरी रंगनाथ समितीने काही भाग कमी करण्यात आल्या होत्या. याबाबतील शेतकर्यांनी गाफील न राहता तसेच संघटित होऊन यावर हरकती द्याव्यात.
धैर्यशील पाटील, खासदार, राज्यसभा
जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 437 गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात रोहा तालुक्यातील 119 गावांचा समावेश आहे. यामध्ये रोहा तालुक्यातील तळाठी सजा चिल्हे मधील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवली आदी गावांचा समावेश आहे. रोहा तहसीलदार,प्रांताधिकारी, उप वन विभागीय अधिकारी,जिल्हाधिकारी, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार जयंता भाई पाटील सह सदरील आमदार यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती यावेळी उपस्थित शेतकरी ग्रामस्थांनी खा. पाटील यांना दिली.
यावेळी ज्ञानेश्वर भोईर, .धनाजी लोखंडे, वसंतराव मरवडे, संदीप महाडिक, रामचंद्र मरवडे, धोंडू कचरे, सखाराम कचरे, राम महाडिक,सुरेश महाडिक, तसेच युवा शेतकरी किशोर भोईर ,संदीप लोखंडे, सुनील महाडिक, जितेंद्र खांडेकर, राम लोखंडे, तुकाराम कोंडे, पांडुरंग गोसावी, सुशील साबळे, विश्वास राऊत,शशिकांत भोईर, ज्ञानेश्वर भोईर,नंदू भोईर,आदी वरील विभागातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी तालुक्यातील एकूण परिस्थितीही उपस्थितांकडून जाणून घेतली.