

खाडीपट्टा (रायगड ) : महाड खाडीपट्टयात वन्यप्राणी माकडांचा गावांमध्ये वावर वाढला असून माकडांच्या धुमाकूळाने नागरिक अक्षरशः कंटाळले असून मोठ्या नुकसानीला देखील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. माकडांचा बंदोबस्त संबंधित वन खात्याने करावा अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
खाडीपट्टयातील तेलंगे, चिंभावे, गोंमेंडी, वराठी, बेबलघर, वलंग, सोनघर, रोहन, जुई येथील डोंगर माथ्यासह वनातील वन्यप्राणी माकड गावामध्ये येऊन धुडगूस घालत असल्याचे नागरिकांनी सांगितले. चिंभावे हळदवणेवाडी, सुतारकोंड, चिंभावे मोहल्ला येथे पन्नास ते साठ माकडांनी गावात येऊन घरावरील कौले काढून मोठे नुकसान पोहोचवले आहे. सदर माकडांचा बंदोबस्त संबंधित वन खात्याने करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
येथील ग्रामीण भागातील डोंगर भागासह माळरानावर शेतकर्यांनी दुबार शेतीतील अपयशामुळे आंबा, काजूच्या लागवड केली आहे. उन्हाळ्यात दरवर्षी लागणार्या वनव्याने वृक्षांची डोळे देखत दिवसाढवल्या कत्तल होत असताना पाहायला मिळत असते त्याचा दुष्परिणाम वन्यजीवांनाही आपल्या प्राणाला मुकावे लागत असते त्यामुळे भीतीपोटी वन्यप्राणी गावामध्ये वळले जातात, मात्र आताच्या स्थितीला देखील वन्यप्राण्यांना खायला फळे, फुले मिळत नसल्याने गावामधील कौलारू घरांवरील कौले काढून थेट घरामध्ये घुसून अन्न पळवून हैदोस घालत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
खाडीपट्टयात सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार धामधूम सुरू असून मुंबईकर नागरिकांनी गावे भरली आहेत. याच दरम्यान माकडांचे विघ्न समोर आले असून माकडांचा घोळकाच्या घोलका एकत्र जमत असून घर, पाडव्यांवर दणादण उड्या मारून नागरिकांना अक्षरश: वैतागून सोडले आहे. मर्कटचाळ्यांनी लहान लहान मुले घाबरत आहेत, तर माकडांना जे मिळेल ते खाण्यावर ताव मारताना दिसत आहेत.
माकडांची आता माकडचेष्टा म्हणून उरलेली नाही, तर माकडांचा एवढा प्रचंड उपद्रव वाढलाय की, माकड काय करू शकतात, याचा आपण अंदाजही बांधू शकत नाही. येथील काही ग्रामीण भागात कुटुंबीय घरात असताना देखील माकडे घराच्या छप्परांची कौले काढून खाली उतरतात. जे जेवण बनवून ठेवलेले असते ते अक्षरश: खाऊन भांडी उलट-सुलट करून टाकतात. अशा उपद्रवी माकडांचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.