

महेंद्र खैरे
रेवदंडा: स्मार्टफोन, सोशल मीडिया, यूट्यूब आणि विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे ऑनलाईन खरेदी-विक्रीचा जमाना आला असला, तरी शहरांसह ग्रामीण भागात घरपोच वस्तू विकणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. ग्राहकांना वस्तू प्रत्यक्ष पाहून, तपासून आणि तात्काळ खरेदी करण्याची संधी मिळत असल्याने अनेकजण अजूनही या विक्रेत्यांना पसंती देत आहेत.
शहरांपासून ते दुर्गम खेड्यापाड्यांपर्यंत विविध वस्तू विकणारे फिरते व्यापारी रोज सायकल, मोटारसायकल, चारचाकी वाहन किंवा पायी घरोघरी फिरताना दिसतात. त्यांच्या जवळ घरगुती उपयोगाच्या वस्तू, प्लास्टिक साहित्य, कांदे-बटाटे, बिस्किटे, बेकरी पदार्थ, कपडे, चादरी तसेच इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध असतात. त्यामुळे ग्राहकांना बाजारपेठेत जाण्याची गरज भासत नाही.
फिरत्या विक्रेत्यांच्या व्यवसायात आजही रोखीच्या व्यवहाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. घरपोच सेवा आणि तात्काळ व्यवहारामुळे ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही याचा फायदा होतो. अनेक विक्रेते मोठ्या शहरांतून घाऊक दराने माल खरेदी करून गावोगावी विक्री करतात आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
ग्रामीण भागात विशेषतः या विक्रेत्यांना मोठी मागणी असून, अनेक कुटुंबे नियमितपणे त्यांच्याकडून खरेदी करताना दिसतात. पावसाळ्यानंतर ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत गावोगावी फिरून व्यवसाय करतात. अनेक फिरते व्यापारी ‘नवे घ्या आणि जुने द्या’ या संकल्पनेवरही व्यवसाय करतात. प्लास्टिकच्या वस्तूंच्या बदल्यात घरातील जुने कपडे घेण्याची अदलाबदल ग्रामीण भागात आजही सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांनाही सोयीचा व्यवहार उपलब्ध होतो.
परप्रांतीय व्यापाऱ्यांचे वर्चस्व
फिरत्या विक्रीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व्यापारी कार्यरत असल्याचे दिसून येते. स्थानिक विक्रेतेही काही प्रमाणात या व्यवसायात आहेत; मात्र बहुसंख्य व्यापारी इतर राज्यांतून आलेले असतात. अनेक वर्षे गावोगावी फिरून त्यांनी ग्राहकांशी विश्वासाचे आणि आपुलकीचे नाते निर्माण केले आहे.