

पनवेल: "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत डान्सबार संस्कृती खपवून घेणार नाही," असा खणखणीत इशारा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पनवेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या आक्रमक 'खळ्ळखट्याक' शैलीत आंदोलन केले.
मनसेचे पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी शहरातील 'नाईट रायडर्स' या डान्सबारची शनिवारी मध्यरात्री मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेमुळे पनवेलमधील अनधिकृत डान्सबारचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल परिसरात अनेक डान्सबार अनधिकृतरित्या सुरू असून, त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याच पार्श्वभूमीवर, योगेश चिले यांच्या नेतृत्वात मनसेचे कार्यकर्ते 'नाईट रायडर्स' या डान्सबारवर धडकले. कार्यकर्त्यांनी सुरुवातीला डान्सबारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी बारमधील खुर्च्या, टेबल आणि इतर साहित्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी बोलताना योगेश चिले म्हणाले, "ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. येथे अशी घाणेरडी संस्कृती आम्ही कदापि सहन करणार नाही. प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे. हा केवळ एक इशारा असून, पनवेलमधील सर्व अनधिकृत डान्सबार बंद झालेच पाहिजेत, अन्यथा मनसे आपल्या शैलीत उत्तर देत राहील."
या तोडफोडीच्या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मनसेच्या या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असला तरी, शहरातील डान्सबार संस्कृतीविरोधात नागरिकांमध्ये असलेल्या रोषाचेच हे प्रतीक असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे पनवेल आणि आसपासच्या परिसरातील अनधिकृत डान्सबारचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे बार मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आता पोलीस प्रशासन यावर काय कायदेशीर कारवाई करणार आणि अनधिकृत डान्सबारवर अंकुश लावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.