

म्हसळा शहर : तालुक्यातील गावठी दारूचे अड्डे तातडीने बंद करून अवैध दारूविक्रीला आळा घालावा, अशी मागणी म्हसळा पंचायत समितीचे उपसभापती लहू म्हात्रे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केली. विशेष म्हणजे, तालुक्यात कुठे-कुठे गावठी दारूविक्री सुरू आहे, याची माहितीही त्यांनी बैठकीत मांडत पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
म्हसळा पोलीस ठाण्यात पोलीस विभागीय अधिकारी योगिता कुटे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी विविध सण-उत्सव शांततेत व सलोख्याने साजरे करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी उपसभापती लहू म्हात्रे यांनी तालुक्यात आजही गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अवैध दारूविक्रीची ठिकाणे प्रशासनाला माहीत असतानाही बेसुमार दारूविक्री सुरूच कशी? असा सवाल करत त्यांनी पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले. आपल्या आक्रमक शैलीत त्यांनी अवैध दारूविक्रीविरोधात ठोस कारवाईची मागणी केली.
दरम्यान, संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर काळोखे यांनीही तालुक्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवर बोट ठेवले. म्हसळा तालुक्यात चरस, गांजा, बटन यांसारख्या अमली पदार्थांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप करत, अशा प्रकारांवर पोलीस प्रशासनाचे लक्ष का जात नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गुन्हे दाखल होतात; मात्र काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांनी शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवावा, याबाबतही चर्चा करण्यात आली.
या बैठकीस नगरपंचायतीचे अध्यक्ष सुनील शेडगे, पंचायत समिती सभापती बबन मनवे, जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, हिंदू संघटना सल्लागार महादेव पाटील, हिंदू संघटना सचिव महेश पवार, ग्रामस्थ मंडळ म्हसळा सचिव सुशील यादव, पंचायत समिती उपसभापती लहू म्हात्रे, संघर्ष समिती अध्यक्ष समीर काळोखे, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष ममोहम्मद अली पेणकर, उपाध्यक्ष मुबशिर जमादार, पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव, तसेच तालुक्यातील हिंदू-मुस्लिम समाजाचे पदाधिकारी, सदस्य, सरपंच व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
शांतता समितीच्या बैठकीतच गावठी दारू आणि अमली पदार्थांच्या समस्येचा मुद्दा थेट पोलीस प्रशासनासमोर मांडण्यात आल्याने, या मागण्यांवर आता पोलीस प्रशासन कोणती ठोस कारवाई करते, याकडे म्हसळा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.