

माथेरान मध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाळी पर्यटनास बहर आला असून रोज येथे येत असलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक व्यवसायिकांना उभारी मिळाली असून हॉटेल व्यवसाय ही तेजीत चालला आहे.मात्र या पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांचा अतिउत्साह नडत असल्याचे पदोपदी जाणवत आहे.
येणारे वीकेंड फुल झाल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे. हॉटेल व्यवसायिकांना विकेड ला आगाऊ बुकिंग साठी रूम्स उपलब्ध नसल्याचे चित्र सध्यातरी आहे. या यावर्षी प्रथमच गुजरात राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहेत. मधल्या दिवसांमध्ये सुद्धा गुजराती पर्यटकांनी माथेरानला प्राधान्य दिल्यामुळे येथील व्यवसायिक ही सुखावला आहे. सर्वांना व्यवसाय मिळत असल्याने हा पर्यटन हंगाम माथेरानकरांना लाभदायक ठरला आहे.
काही ठिकाणी मद्यपी पर्यटकांमुळे काही गडबड होऊ नये याकरिता वीकेंडला पोलीस यंत्रणा सज्ज असल्यामुळे अशा लोकांना चाप लावण्याचे काम केले जात आहे. येथील शार्लेट लेक येथे धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते वीकेंडला येथे उभे राहण्यास जागा नसते अशा वेळी कोणतीही अनुचित घटना होऊ नये याकरिता माथेरानचे एपीआय अनिल सोनोने यांनी विशेष बंदोबस्त ठेवल्याने आतापर्यंत तरी येथे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
माथेरान मध्ये मागील एक आठवड्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शासन ही सतर्क झाले आहे. आतापर्यंत माथेरान मध्ये काल 144.6 मिमी तर ह्यावर्ष्यात 3557.2 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. ह्या आठवड्यात माथेरान मध्ये सातत्याने पावसाने शंभरी गाठली आहे. परंतु इतका पाऊस होऊन ही येथे कोणतीही दुर्घटना घडलेली नाही त्यामुळे माथेरान हे पावसाळी पर्यटनासाठी एक सुरक्षित ठिकाण म्हणून प्रसिद्ध होत आहे व येथे मध्यपि पर्यटकांचा त्रास ही नसल्याने कौटुंबिक पर्यटन जास्त प्रमाणात वाढत आहे.
राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाल्यापासून विविध ठिकाणी अति उत्साही पर्यटकांमुळे अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. परंतु मुंबई पुण्यापासून जवळचे पर्वतीय पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये मात्र पर्यटकांना सुरक्षित वाटत असल्याने येथे रोजच पर्यटकांचा ओढा वाढत आहे. आतापर्यंत 15 जून नंतर अडीच लाखाच्या आसपास पर्यटकांनी माथेरानला भेट दिली आहे.