

मिलिंद कदम
माथेरान: मागील तीन दिवसांपासून सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे माथेमानमध्ये सुमारे पन्नास हजारहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. मात्र प्रचंड गर्दीमुळे माथेरानचे पर्यटन नियोजन कोलमडले आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे सुट्ट्यांमध्ये माथेरानमध्ये पर्यटकांना नाहक त्रास सामोरे जावे लागले आहे.
यामध्ये अनेक लोकांनी वाहत्या गंगेत हात धुतले असून सतत होणाऱ्या या प्रकारामुळे येथे येणारा धनिक पर्यटक मात्र माथेरानकडे पाठ करू लागला आहे, जी माथेरानसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळेच आता तरी प्रशासन माथेरानमधील पर्यटन नियोजनाकरिता उपाययोजना करेल का असा प्रश्न समोर येत आहे.
१५ ऑगस्टला सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे माथेरान मध्ये रेकॉर्ड पर्यटक आले होते. शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवस येथे पर्यटकांचा महापूर आला होता या काळात माथेरान मध्ये या आठवड्यात ५० हजाराहून जास्त पर्यटकांनी भेट दिली होती. कोरोना नंतर पावसाळी पर्यटन तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
त्यातच सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे ही संख्या वाढत असते. कालही माथेरान येथे रेकॉर्ड पर्यटकांनी भेट दिली होती व माथेरानची पर्यटक क्षमता कमी आहे. येथे सात हजारपर्यंत पर्यटक आले तर सर्व हॉटेल, लॉजिंग व्यवसाय फुल होतो.
नेरळ-माथेरान दरम्यान ४०० टॅक्सी सेवा देतात तर ई रिक्षा फक्त २५ आहेत व त्यातील चार पाच नादुरुस्त असतात, दस्तुरी नाका येथे दीडशेच्या आसपास प्रवासी घोडे आहेत तर मोजून १० हात रिक्षा उभ्या असतात. मिनी ट्रेन शटल सेवेच्या दररोज सहा फेऱ्या असतात तर वीकेंड ला दोन फेऱ्यांची वाढ होत असते ही वाहतूक सेवा येणाऱ्या पर्यटकांसाठी अपुरी आहे. एकच वेळी घाटामध्ये चारशे टॅक्सी, पर्यटकांची पाचशे वाहने तेवढ्याच दुचाकी आल्यावर घाट रस्ता जाम होऊन वाहतूक कोंडी होत आहे.
पावसाळ्यात येथील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत परंतु आगामी काळातील पर्यटन हंगामाकरिता या चुका दुरुस्त करायच्या असतील तर दूरदृष्टी ठेवून माथेरानचा पर्यटन विकास सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व स्वबळावर निर्णय घेऊन माथेरान विरोधी लोकांवर दबाव टाकणारे आल्यास माथेरानचा पर्यटन विकास शक्य होणार आहे. पर्यटन ठिकाणी वाहतूकसारखी प्रमुख सुविधा रस्ते अद्यावत असणे आवश्यक आहे. यातून पुन्हा येथे पर्यटक येण्याचा विचार करेल.