

माथेरान : माथेरानमध्ये पावसाळ्यात मातीच्या रस्त्यांची धूप होऊ नये यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून संपूर्ण भागात जवळपास एक हजार पेक्षाही अधिक दगड मातीचे बंधारे टाकण्याची पूर्वापार पद्धत आजही कायम आहे.
या बंधार्यांमुळे काहीअंशी का होईना मातीची धूप कमी प्रमाणात होण्यास मदत होते. त्यातच वनखात्याच्या जाचक अटीमुळे जंगलात मातीचे उत्खनन करता येत नाही, त्यामुळे जवळच्या गटारातील मातीच्या साहाय्याने हे बंधारे टाकण्यात येतात. दस्तुरीपासून ते सार्वजनिक वाचनालयापर्यंत क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते केल्यामुळे पावसाळी मातीची धूप आणि उन्हाळ्यात सुक्या मातीचा धुरळा उडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
दरवर्षी मोठया प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असते यावर्षी जवळपास 2013 मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापुढेही आगामी काळात अशीच पर्जन्यवृष्टी राहिली तर काही भागातील हे मातीचे रस्ते शाबूत राहणार नाहीत. त्या रस्त्यांचे एखाद्या नाल्यात रूपांतर होऊन जुने ब्रिटिश कालीन रस्ते इतिहासजमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकामी ज्या ज्या ठिकाणी दगड मातीचे रस्ते आहेत त्यांचे क्ले पेव्हर ब्लॉकमध्ये रूपांतर केल्यास रस्त्यांची धूप थांबू शकते.