

माथेरान : मिलिंद कदम
माथेरानमधील पंचावन्न वर्षीय हात रिक्षा चालक अंबालाल वाघेला यांना हातरिक्षा चालवण्याचा फटका बसला असून हृदयविकाराने त्यांना ग्रासले व देव बनवत्तर म्हणून त्यांचा जीव थोडक्यात वाचला.
हात रिक्षा ओढताना अंबालाल वाघेला यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना छातीत दुखू लागल्याने येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांना बी.जे. हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत यादव यांनी शुक्रवारी रात्री तात्काळ उपचार केल्याने त्यांची प्रकृती स्थिर झाली. पुढील उपचारासाठी त्यांना एम.जी.एम. हॉस्पिटल नवी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.
डॉ. यादव यांनी सांगितले की, अंबालाल यांची लक्षणे पाहता हे स्पष्ट होते की सततचा श्रम आणि शारीरिक ताण यामुळे हृदयावर परिणाम झाला. डॉक्टरांनी आता त्यांना कोणत्याही श्रमाच्या कामास मनाई केली आहे. दरम्यान, अंबालाल यांची पत्नी गीता वाघेला यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, अंबालाल यांनी स्वतः च्या पैशाने ई-रीक्षा खरेदी केली आहे. त्यामुळे त्यांना ती चालविण्यास तात्काळ परवानगी द्यावी. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांनी तीन महिन्यांपूर्वीच्या ऐतिहासिक निर्णयात स्पष्टपणे म्हटले आहे की, हात रीक्षा ही अमानवीय प्रथा असून यामुळे चालकांवर गंभीर शारीरिक परिणाम होतात-हृदयविकार, दमा, अशक्तपणा यासारख्या आजारांना ते बळी पडतात. त्यामुळे सहा महिन्यांत सर्व हात रीक्षा बंद करून चालकांचे पुनर्वसन ई-रीक्षा योजनेंतर्गत करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशाला दोन महिने उलटूनही सनियंत्रण समितीची एकही बैठक झाली नाही. प्रशासनाचा हा ढिसाळपणा पाहून रिक्षाचालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गेल्या डिसेंबरमध्येच हात रीक्षा ओढताना चालक काळुराम पिरकट यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता.
सुप्रीम कोर्टाच्या स्पष्ट आदेशानंतरही सनियंत्रण समिती रिक्षावाल्यांचे जीव गमावल्यानंतरच जागी होणार का? दररोज हातात ओझं घेणाऱ्यांचा हा श्वास थांबायच्या आत सरकारने निर्णय घ्यायलाच हवा!
गणपत रांजाणे, हात रिक्षा चालक