

माथेरान : माथेरानमध्ये 2 सप्टेंबरपासून घोड्यांना विचित्र रोगाची लागण झाली होती. येथील काही घोड्यांना तबेल्यातच अंधत्व आले होते. हळहळू संख्या वाढत जाऊन अकरा घोडे या रोगाने त्रस्त असल्याचे आढळून आले. मात्र येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरचे पद भरले नसल्याने डॉक्टर उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे येथील अश्वपालकांनी खाजगी डॉक्टरची मदत घेतली. मात्र ती अतिशय खर्चिक बाब होती. यामुळे पशुसंवर्धन विभाग खडबडून जागे झाले असून त्यांनी त्वरित माथेरानमध्ये घोड्यांचे तपासणी आणि स्क्रीनिंग केली व मोफत औषधोपचार केले.
माथेरानमध्ये प्रवासी वाहन घोडा संख्या 460 असून 300 घोडे माल वाहतुकीचे आहेत. त्यातील प्रवासी घोड्यातील अकरा घोड्यांना डोळ्यांची दृष्टी कमी होऊन अंधत्व येऊ लागले. यावर येथील अश्वपालक हवालदिल झाले होते. माथेरान या पर्यटन नगरीत त्यांच्यावर चिंतेचे ढग सतावत होते. यावर आवाज उठविल्यावर पशुसंवर्धन विभागाला खडबडून जाग आली. आणि त्यांनी माथेरान गाठून येथील घोड्यांच्या तपासणीस सुरवात केली.
एकूण 25 अधिकारी आणि कर्मचार्यांची टीम माथेरानमध्ये धडकली. तीन टीममध्ये विभागणी करून तपासणीस सुरुवात झाली. मुंबई येथील कोकण विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.प्रशांत कांबळे, रायगड जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे, कर्जत तालुका लघु पशुवैद्यकीय व सर्व चिकित्सालय सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.शामराव कदम, रायगड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉ.रत्नाकर काळे, अलिबाग रायगड जिल्हा वैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.अजय कांबळे, पंचायत समिती कर्जतमधील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.सचिन भोसले, माथेरानमधील पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रशांत माळी यांनी सर्व माथेरान पिंजून काढत घोड्यांची तपासणी केली.
एक टीम दस्तुरी येथे दुसरी टीम मुख्य मार्केट मध्ये तर तिसरी टीम ही फिरती ठेवली होती. सुरुवातीला लागण झालेल्या अकरा घोड्यांना तपासले गेले त्यामध्ये दहा घोड्यांची दृष्टी पुन्हा येऊन ते ठणठणीत बरे झाले तर एक घोडा ज्याला अजूनही दृष्टी अंधुक दिसत असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही तपासणी सुरु असताना अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम, सचिन पाटील,शैलेश शिंदे उपाध्यक्ष गणेश घावरे हे या टीमला सर्वतोपरी सहकार्य करत होते.
16 सप्टेंबर रोजी येथील दोन घोड्यांना अंधत्वाची लक्षणे दिसून आली. त्यांना तपासल्यानंतर त्यातील एक घोड्याची दृष्टी येऊ लागली आहे व दुसर्या घोड्यावर उपचार सुरू आहेत. तोही लवकर ठीक होईल. आज आम्ही सर्व घोड्यांची तपासणी आणि स्क्रीनिंग करतोय.
डॉ. प्रशांत कांबळे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, कोकण विभाग, मुंबई
आमच्या अकरा घोड्यांना अंधत्व आले होते, त्यातील नऊ घोड्यांना दृष्टी आली असून दोन घोड्यांवर उपचार सुरू असून ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. कर्जत तालुक्यात जितके पशुधन नाही तितके माथेरानमध्ये आहे आणि तरीही येथील दवाखान्यात डॉक्टरची नेमणूक केली नाही हे खेदजनक आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन येथे प्रभारी डॉक्टरची नेमणूक करावी अशी आमची आग्रही मागणी आहे.
आशा कदम, अध्यक्षा, स्थानिक अश्वपाल संघटना