कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातगाडी चालविताना माथेरानमधील एका हातरिक्षा चालकाला आपला प्राण गमवावा लागला. ऐन दिवाळी दिवशीच ही दुर्घटना घडल्याने माथेरान वासियांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे अमानवी हातरिक्षा व्यावसायिकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून प्रमुख वाहन म्हणून हात रिक्षाचा वापर केला जातो या रिक्षा खेचताना रिक्षा चालक मरण यातना भोगत या रिक्षा खेचत असतो. याविरुद्ध रिक्षाचालक संघटनेने सातत्याने न्यायालयाचे दरवाजे वाचून न्याय करत याचना केल्या आहेत. परंतु त्यांना न्याय मिळत नाही. हे रिक्षा चालक दिवसेंदिवस मृत्यूशी खेळत असल्याचे या घटनेवरुन अधोरेखित झाले. एक अमानवीय प्रथा असून दुर्दैवाने आजही माथेरानला सुरू आहे.
गुरुवारी सकाळी परशुराम उर्फ कालुराम पिरकट (वय 45) या आदिवासी हातरिक्षा चालकाचा रिक्षा ओढताना हॉटेल शालिमार जवळ रक्ताची उलटी होवून मृत्यू झाला. मोरबे डॅम चौक जवळील निंबरवाडी येथील आदिवासी वाड्यात परशुराम राहतात. गेल्या 15 वर्षापासून माथेरान येथे हातरिक्षा ओढण्याचे काम करून उपजीविका सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमध्ये प्रथम सात इ रिक्षांना परवानगी देऊन येथील रस्त्यांवर त्या कशा चालतात हे पहावयास सांगितले त्यानंतर आणखी 13 म्हणजेच 19 रिक्षांना प्राथमिक स्वरूपात परवानगी देताना पावसाळ्यामध्ये या रिक्षा कशा चालतात यावर अहवाल सादर करण्यास सांगितले. परंतु त्यानंतर त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नसून येथील रस्ते व ई रिक्षा प्रकल्प अजूनही न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहे. न्याय देण्यासाठी विलंब होत असल्याने अजून किती लोकांच्या मृत्यूचे न्यायालय वाट पाहते असा प्रश्न हात रिक्षा चालकांकडून केला जातोय.
हातरिक्षा ओढताना हृदयावर प्रचंड ताण पडतो. अशाचप्रकारे मागील काही वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मजूर इथे हा व्यवसाय करण्यासाठी यायचे. त्यातील अनेक जणांचा रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झाला आहे. तर काहींना हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. कुटुंबासाठी नाईलाजाने ही अतिकष्टादायी कामे करावी लागत आहेत.