

माथेरान ः मिलिंद कदम
माथेरानला येणार्या पर्यटकांना मुख्य प्रवेशद्वार असणार्या दस्तुरी नाक्यावरून शहरात येण्यासाठी जी काही आवश्यक माहिती ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून देण्यात येत होती ती काही दिवसांपासून बंद झाल्याने शहरात जाण्यासाठी वाहतुकीची कशाप्रकारे सुविधा उपलब्ध आहे, याबाबत पर्यटकांना माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेकदा याठिकाणी पर्यटकांची दिशाभूल होत असल्याने दस्तुरी नाक्यावर माहिती फलक त्याचप्रमाणे कोणकोणती वाहतुकीची सुविधा आहे. याबाबत प्रशासनाने पुढाकार घेऊन पर्यटकांना अद्ययावत माहिती मिळण्याची सोय करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
काही वर्षांपासून दस्तुरी नाक्यावर ज्याप्रकारे पर्यटकांची दिशाभूल होऊन त्यांना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन केले जात होते त्यामुळे या स्थळाची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन झाली होती. याचा इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होऊन याची प्रामुख्याने झळ ही स्थानिकांना, व्यापारी, दुकानदार यांना मोठया प्रमाणात सोसावी लागत होती.
याकामी माथेरानप्रेमी नागरिकांनी पर्यटन बचाव संघर्ष समिती स्थापन करून दस्तुरी या ठिकाणी सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी संघर्ष केल्यानंतर दस्तुरी नाक्यावर ध्वनिक्षेपक द्वारे विविध भाषामधून माहिती देण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे पर्यटकांना आपल्या सोयीनुसार तेथील घोडा, हातरीक्षा, मिनिट्रेनची शटल सुविधा आणि ई रिक्षाच्या माध्यमातून प्रवास करणे सोयीचे बनले होते. परंतु ध्वनिक्षेपक बंद झाल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याठिकाणी साधा माहिती फलक लावण्याची तयारी प्रशासनात नव्हती. त्यावेळी पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे या महत्त्वाच्या गोष्टी सुरू करण्यात आल्या होत्या.
त्यामुळे लवकरच सर्व गोष्टी पुन्हा एकदा सुरू करून इथले पर्यटन कशाप्रकारे बहरेल यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. ध्वनिक्षेपक सुविधा बंद करण्यासाठी कुणी राजकीय पक्षांच्या मंडळींनी प्रशासनाला धारेवर धरले तर नाही ना ? असाही प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे.
माथेरान येथील पर्यावरण अबाधित राहावे येथे जगभरातून येणार्या प्रत्येक पर्यटकाची फसवणूक होऊ न देता येथील पर्यटनाचे योग्य मार्गदर्शन झाले पाहिजे त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे व इथल्या पर्यटन व्यवसायात भर पडावा केवळ या उद्देशातून माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीची स्थापना झाली यामध्ये सर्वपक्षीय प्रतिनिधीचा समावेश आहे आणि या संदर्भात कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान नगरपरिषदेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात सर्व विभागाच्या अधिकारी वर्गासोबत बैठक झाली होती आणि त्यामध्ये माथेरानच्या विविध समस्यावर पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले होते मात्र स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी झालेली दिसत नाही.मग असा प्रश्न निर्माण होतो की आमदार यांच्या उपस्थितीत पार पडलेली बैठक केवळ कागदोपत्री होती का ?आणि संघर्ष समितीने यासाठी पुन्हा आंदोलन करायला पाहिजे का ? माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने स्थानिक प्रशासनाकडे याबाबत वारंवार विचारणा करण्यात आली मात्र थातूर मातुर उत्तरे दिली जातात हे अत्यंत खेदजनक असून येणार्या काळात स्थानिक प्रशासनाने योग्य ती पावले उचलून व ठोस उपाययोजना करून माथेरानकरांना अपेक्षित असणार्या समस्या लवकरात लवकर दूर कराव्यात.
चंद्रकांत जाधव, माजी उप नगराध्यक्ष