

माणगाव (रायगड) : कमलाकर होवाळ
शुक्रवारी (दि.15) स्वातंत्र्य दिन, शनिवारी (दि.16) गोपळकाला आणि रविवार (दि.17)अशा सलग सुट्यामुळे गेल्या गुरुवारी (दि.14) दुपार पासून कोकणात जाणार्या आणि सकाळपासून मुंबईस परतणार्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दरम्यान याच चार दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील गोवा महामार्र्गावर देखील मोठी वाहतूक कोंडी होवून प्रवासी तीन ते चार तास प्रवासात रखडले.
माणगाव बाजारपेठ या ठिकाणी तर अक्षरशः गाड्यांचा अडकून पडल्या होत्या. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, गोपाळकाला आणि रविवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा आनंद घेऊन हजारो पर्यटक कोकणातून परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र या प्रवासाने त्यांना सुट्टीचा आनंद नाही तर प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागला. तीन ते पाच तास रस्त्यावर अडकून राहिलेले पर्यटक व कोकणवासीयांची अवस्था दयनीय झाली होती. मुसळधार पावसात वाहनात अडकून पडलेले तसेच अन्नाविना अस्वस्थ झालेल्या प्रवाशांची दुरावस्था पाहून प्रशासनाचे उदासीन धोरण ठळकपणे उघड झाले.
महामार्गाचे रखडलेले काम तसेच माणगाव व इंदापूर मधील बायपासचे काम मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, हे काम कधी पूर्ण होणार याचा ठावठिकाणा नाही. वेळोवेळी गाजावाजा करून दिलेली आश्वासने निष्फळ ठरली आहेत. प्रचंड निधी खर्ची घालूनही आजपर्यंत फक्त अपूर्ण व खडबडीत महामार्गच जनतेला मिळाला आहे. गाड्यांचे अपघात, प्रचंड विलंब, रुग्णवाहिकांना होणारा अडथळा यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत.