

Kshetrapal Village Landslide
पोलादपूर : तालुक्यातील क्षेत्रपाळ गावालगत मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन (दगड-माती कोसळण्याची घटना) घडल्याने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत शेतीचे अतोनात नुकसान झाले असून पिण्याच्या पाण्याच्या विहिरीही मातीच्या प्रवाहात वाहून गेल्याने गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. क्षेत्रपाळ येथील धनगरवाडीतील धोकादायक भागात राहणाऱ्या काही कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून त्यांची आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, एनडीआरएफ (NDRF) तसेच 'नरवीर रेस्क्यू टीम' घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी परिसराची पाहणी करून बचाव आणि मदतकार्याला वेग दिला.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रकांत कळंबे, पंचायत समिती सदस्य अविनाश शिंदे, युवासेनेचे तालुका संपर्क प्रमुख विजय शेलार आणि तालुका प्रमुख विक्रम भिलारे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला.
'नरवीर रेस्क्यू टीम'चे संस्थापक रामदास कळंबे यांनी स्वतःची जेसीबी उपलब्ध करून देत रेस्क्यू पथकासह ढिगारे हटविणे, रस्ते मोकळे करणे आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून बाधित नागरिकांना आवश्यक मदत व दिलासा देण्याचे काम सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
कुडपण खुर्द गावात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची नोंद नसून परिसर सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना सतर्कता, सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले.