

कमलाकर होवाळ
माणगाव: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुप्रतीक्षित माणगाव-इंदापूर बायपास गणेशोत्सवापूर्वी किमान एकेरी वाहतुकीसाठी खुला होणार, असा दावा पुन्हा एकदा समोर आला असला तरी प्रत्यक्ष कामाची सद्यस्थिती पाहता हा दावा वास्तवापासून दूर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
गेली १७ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा आश्वासनांची मालिका सुरू झाली असून, प्रत्यक्ष कामाच्या गतीवर मात्र प्रश्नचिन्ह कायमच राहिले असून बायपासच्या कामाचा ब्रिजचे काम रेंगाळले आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे एका एक महिन्यात कसे पूर्ण होणार यावर प्रश्नचिन्ह उभारले जात असून गणेशोत्सवापूर्वी एकरी मार्गीका सुरू होईल असे लोकप्रतिनिधी सांगून आश्वासनाचा पाऊस पाडत आहेत. त्यामुळे या मार्गावर तारीख पे तारीख मिळत आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच बायपासची पाहणी करून गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका सुरू करण्याचे निर्देश दिले.
मात्र त्याआधी अवघ्या महिनाभरापूर्वी ग्रामविकास व रोजगार हमी मंत्री ना. भरत गोगावले यांनीही याच प्रकल्पाची पाहणी करून अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला होता. त्या वेळीही कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही प्रत्यक्षात कामाचा वेग पोहोचलेला दिसत नाही.
कोकणात मुसळधार पावसाचा हंगाम सुरू असून अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावरील महामार्गाचे बांधकाम पूर्ण करणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण मानले जाते. विशेषतः कोकण रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल आणि गोध नदीवरील पुलाचे काम अद्याप प्राथमिक अवस्थेत असल्याचे चित्र आहे.
अनेक ठिकाणी केवळ पीसीसी कॉलम उभे करण्यात आले असून मुख्य गर्डर, डेक स्लॅब आणि जोडरस्त्यांची कामे अद्याप बाकी आहेत. याशिवाय पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकणे आवश्यक आहे.
मात्र पावसाळ्यात अशा प्रकारचा भराव करणे अवघड असते. आवश्यक माती उपलब्ध करून ती वाहून आणणे, तिचे योग्य संपीडन करणे आणि त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एकेरी वाहतूक सुरू होईल, या दाव्याबाबत अभियंते आणि स्थानिक जाणकारही साशंक असल्याचे बोलले जात आहे.
पाहणी दौऱ्यावेळी निवडक भागच दाखवले जातात, तर उर्वरित अपूर्ण कामांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक पाहणी नंतर नवीन मुदत जाहीर होते; मात्र प्रत्यक्षात काम पूर्णत्वास जात नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. गेल्या १७ वर्षांत या प्रकल्पासाठी अनेक वेळा अंतिम मुदती जाहीर झाल्या.
विविध सरकारे आणि लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आश्वासने दिली; परंतु प्रत्येक वेळी मुदत पुढेच ढकलली गेली. त्यामुळे आता नागरिकांचा विश्वास केवळ घोषणांवर राहिलेला नाही. 'तारीख पे तारीख' देऊन तात्पुरते समाधान केले जाते, मात्र काम मात्र संथगतीनेच सुरू राहते, अशी टीका नागरिक करत आहेत.
गणेशोत्सव आला की बायपासची आठवण आणि आश्वासनांचा पाऊस, हा गेल्या अनेक वर्षांचा ठरलेला पायंडा आहे. प्रत्यक्षात ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी स्थानिकांना विश्वासात घेत नाहीत, त्यामुळे प्रश्न कायमच प्रलंबित राहतात. रेड्डीज हॉटेल आणि मुगवली गणपती फाटा येथे सर्व्हिस रोड व सिग्नल नसल्याने प्रवासी नागरिकांचा जीव धोक्यात आहे. दुसरीकडे कोकण रेल्वे व महामार्गाच्या भरावामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून मोठे नुकसान होत असतानाही शासन आणि लोकप्रतिनिधी मौन बाळगून आहेत. आता केवळ आश्वासने नव्हे, तर न्याय देण्याची वेळ आली आहे.
- ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष