

पनवेल : रोजगार हमी योजना ही राज्यातील गोरगरीब जनतेसाठी उपयुक्त ठरली आहे. सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे ही रोहयोमधून पूर्ण झालेली आहेत. या योजनेसाठी जे निकष आहेत, ते 20 वर्षांपूर्वीपासूनचे आहेत. त्यामुळे योजनेसाठी हवा तेवढा निधी मिळत नाही. त्यामुळे रोजगार हमी योजना विभाग आणि ग्रामविकास विभाग या दोन खात्यांच्या माध्यमातून रोहयोचे जुने निकष बदलून नवीन आराखडा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा रोजगार हमी, खारभूमी विकास मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी पनवेल येथे केली. पुढारी परिवारातर्फे रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील 40 जणांचा आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ना. गोगावले बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
रोहयोतून अनेक विकासकामे साध्य करता आलेली आहेत. मात्र या योजनेचे निषक हे 20 वर्षांपूर्वीचे असल्याने योजनांसाठी अपेक्षित निधी उपलब्ध होत नाही. रोहयोवर काम करणार्या मजुरांनाही अपेक्षित मजुरी मिळत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. यावर ग्रामविकास विभाग आणि रोहयो विभाग या ग्रामीण भागाशी निगडीत असलेल्या खात्यांमार्फत रोहयोचा नवीन आराखडा तयार केला जात आहे. त्यातून निधीही मिळेल आणि सध्या राज्यात रोजगार हमी योजनेत काम करणार्या मजुरांना 580 रुपये दिले जातात. पण, मिळणारी ही मजुरी अतिशय तोकडी आहे. ती वाढवून 800 रुपये केली जाणार आहे. तसा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून योजनेसाठीचा निधीही वाढवून घेतला जाणार आहे. त्यामधून ही मजुरी निश्चित वाढवून देण्याचे ना. गोगावले यांनी केले.
कोकणात इंदिरा आवास योजनेची अनेक घरे मोडकळीस आलेली आहेत. त्यांनाही आता नवीन बांधकामासाठी निधी दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रायगड, पालघर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेच्या घरांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे काम दोन्ही जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. भाषणातून त्यांनी आपल्या खात्यामार्फत राबवल्या जात असलेल्या रोहयोतील विविध कामांची माहिती उपस्थितांना दिली. गावच्या विकासात रोहयोतून कामे करून घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येत असून, रोहयोची प्रभावीपणे अंमलबजावणी करून सरपंच यांनी गावाचा विकास साधावा, असे आवाहन गोगावले यांनी केले. त्यांनी अत्यंत प्रभावीपणे विचार मांडले. आपल्या राजकीय जीवनाची सुरुवातही सरपंच पदापासून झाली असून गावातील लोकांचा विश्वास संपादित करून मंत्रिपदापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. सरपंच हाच त्या गावचा मालक असतो. त्यामुळे गावातील प्रमुख समस्या म्हणजे पिण्याचे पाणी, गटारे, लाईट या आहेत. त्या प्रामुख्याने सोडवाव्याच लागतात, असे त्यांनी सांगितले. रोहयोच्या माध्यमातून राबवलेल्या विविध योजनांची माहिती मंत्र्यांनी दिली. ग्रामविकास व रोहयो ही दोन्ही खाती ग्रामविभागाशी निगडीत असून सरकारमधील हे दोन्ही विभाग समन्वय साधून विकासकामे करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्याच्या, देशाच्या सर्वांगीण विकासात ग्रामविकास हा महत्वाचा घटक आहे. यासाठी आधी आपल्या गावांचा सर्वांगीण विकास साधा, असे आवाहन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. पुढारीने सुरू केलेल्या सरपंच सन्मान पुरस्कार योजनेचे त्यांनी कौतुक केले. सरपंच हा विकास प्रक्रियेमधील एक मोठा घटक आहे. त्यामुळे गावाच्या विकासासाठी त्यांनी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. गावांच्या मूलभूत गरजा पूर्ण समन्वय साधून त्याची पूर्तता करून घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
माजी खा. रामशेठ ठाकूर यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेले आहे. याचे औचित्य साधत पुढारी परिवारातर्फे रामशेठ ठाकूर यांचा सन्मानपत्र, शाल देऊन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मंत्र्यांनी आपल्या भाषणातून ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक केले. गोगावले यांनी त्यांना शतायुषी व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या. तर ना. गोरे यांनीही रामशेठ हे राजकारणातील एक आदरणीय व्यक्तिमत्व असल्याचे नमूद केले. या सर्वांच्या शुभेच्छांनी भारावलेल्या रामशेठ ठाकूर यांनी आता मी निवृत्तीचे जीवन जगत आहे. आज या कार्यक्रमाला प्रशांत येणार नसेल म्हणून मी बदली खेळाडू म्हणून उपस्थित राहिलेलो आहे, परमेश्वराची कृपा आणि जनतेचे प्रेम हीच आपली खरी संपत्ती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आज केंद्रातील आणि राज्यातील सरकारतर्फे अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. त्या योजना गावागावात पोहोचवून त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे काम हे गावप्रमुख म्हणून सरपंचांना करावे लागणार आहे. त्या योजना राबविल्या गेल्या तर निश्चितपणे गावाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला.