

महाड ः महाड नगरपरिषद, कृषी महाविद्यालय मोहोप्रे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश भक्तांसाठी निर्माल्य द्या कंपोस्ट खत घ्या हा पर्यावरण पूरकअभिनव उपक्रम चालू वर्षी देखील राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
कोकणात लाडक्या भक्तांचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन लवकरच होणार आहे. बाप्पाच्या आदरातिथ्यात कमतरता राहू नये, याची प्रत्येक भक्त मनोभावे काळजी घेतो आहे. बाप्पाची पूजा करताना त्याला पाने, फुले, हार, फळे, पत्री, दुर्वा असे सारे काही मनोभावे रोज अर्पण केले जाते.
या पाना-फुलांचे दुसर्या दिवशी निर्माल्य होते. हे निर्माल्य कचर्याच्या डब्यात तेथून घंटागाडीत आणि नंतर थेट कचरा डेपोमध्ये जाते. परमेश्वरचरणी वाहिले जाणारे हे निर्माल्य पुन्हा निसर्गामध्येच एकरूप व्हावे ह्या संकल्पनेतून उत्सव काळात घरात निघणारे निर्माल्य श्री गणेश भक्तांनी फेकून न देता संकलित करावे, असे आवाहन कृषी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. वैभव गिम्हवणेकर यांनी केले आहे. त्याचे उत्कृष्ट सेंद्रीय (कंपोस्ट) खत तयार केले जाते.
14 जानेवारी 2026 रोजी संक्रांतीला तिळगुळ देण्यासाठी येणार्यांना हे कंपोस्ट खत भेट म्हणून दिले जाणार आहे. घराच्या बाल्कनी, टेरेसवरील कुंड्या किंवा अंगणातील झाडांना हे सेंद्रीय खत टाकून निसर्ग देवतेला स्मरण्याचे आवाहन कृषी महाविद्यालय, महाड कडून केले जात आहे. या माध्यमातून भगवंताचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी श्री गणेश भक्तांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी निर्माल्य संकलनात सहयोग द्यावा, असे आवाहन ’ कृषी महाविद्यालय ’ तर्फे करण्यात येत आहे.
निर्माल्याचे उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार होण्यास तीन ते चार महिने लागतात. तयार झालेले कंपोस्ट खत श्री. गणेश भक्तांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. निर्माल्य संकलनासाठी श्री गणेश भक्तांनी प्राचार्य डॉ. वैभव गिम्हवणेकर +91 83907 17365 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषि महाविद्यालय आणि महाड नगर परिषद चे वतीने करण्यात येत आहे.
लोक निसर्ग संवर्धनाबाबत जागरुक होत असून कृषि महाविद्यालय च्या विधायक आणि रचनात्मक उपक्रमाला महाडकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. तसेच निर्माल्य द्या आणि कपोस्ट खत घ्या या संकल्पनेला महाडकरांनी मागील अनेक वर्षापासून उस्फुर्त प्रतिसाद दिलेला आहे. ठरल्या प्रमाणे सक्रांतीला महाडकरांना कंपोस्ट खत चे निशुल्क वाटप सुद्धा करण्यात आलेले आहे. शेकडो कुटुंब या माध्यमातून कृषी महाविद्यालयशी जोडली गेली आहेत.
मनोभावे पूजा करा, निर्माल्य जपून ठेवा
गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करताना पान, फुले, फळे, पत्री त्यांच्या चरणी वाहिली जातात. श्रद्धेने वाहिले जाणारे हे निर्माल्य कचरा कुंडीत फेकून न देता एकत्र करून ठेवा. तुमच्या सवडीने ते आमच्याकडे जमा करा. सक्रांतीच्या दिवशी आमच्याकडून आपल्या अंगणातील रोपांसाठी सेंद्रीय खत घेऊन जा, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्नित कृषी महाविद्यालय - महाड आणि महाड नगर परिषद कडून केले जाते आहे.
मोहोप्रेत संकलन केेंद्र
निर्माल्य संकलित करण्यासाठी ग्राम मोहोप्रे - महाड येथील कृषी महाविद्यालय चे कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पा अंतर्गत विशेष संकलन केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कचरा निर्मूलन, कचरा विलगीकरणाची सवय लागणे आणि आपल्याच घरातील कुंडीत फळभाजी व पालेभाजी पिकविण्याचा आनंद नागरिकांना मिळावा, असा या उपक्रमामागील उद्देश आहे.