

महाड : तहसीलदार महाड, पोलीस निरीक्षक महाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक एमआयडीसी, यांच्याकडील प्राप्त झालेल्या 20 जूनच्या अहवालानुसार महाड तालुक्यातील सहा धबधब्यांच्या ठिकाणी व पाच धरण क्षेत्रामध्ये 3 जुलै पासून 31 ऑगस्ट 2025 या कालावधी दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
यासंदर्भात देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रामध्ये महाड तालुक्यातील मौजे मांडले, मौजे केंभुर्ली , मौजे वाकी बुद्रुक येथील नाणिमाची, मौजे भावे, मौजे शेवते अड्राई व मौजे रानवडी येथील सातसडा या धबधब्यांच्या ठिकाणी तर तालुक्यांतील कोथुर्डे, वरंध, खैरे, कुर्ले, व खिंड वाडी या धरण क्षेत्रात प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत.
धबधब्यांच्या परिसरामध्ये मद्यधुंद अवस्थेत वावरणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे, पावसामुळे धोकादायक ठरलेल्या ठिकाणी सेल्फी व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे, पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात खोल पाण्यात उतरणे, त्यामध्ये पोहणे, धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, बाटल्या उघड्यावर फेकणे, सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे इत्यादी बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यासह धबधब्याच्या व धरणाच्या एक किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, चार चाकी वाहनांना अत्यावश्यक सेवा वगळून प्रवेश बंद करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रामध्ये नमूद केले आहे.