

महाड : श्रीकृष्ण द. बाळ
सुमारे 40 वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पैगंबर वाशी बॅरिस्टर अंतुले यांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेल्या दादली पुलाला नवीन पर्याय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्तावित करण्यात आलेल्या पुलाच्या जागेवरून महाडकर नागरिकांमध्ये तीव्र भावना व्यक्त होत असून बांधकाम विभागाकडून प्रस्तावित केलेल्या जागेला नागरिकांचा विरोध आता वाढू लागला आहे.
यासंदर्भात महाडकर नागरिकांची प्रतिनिधी म्हणून स्थापन झालेली महाड पूर निवारण समितीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असून बांधकाम विभागाच्या प्रस्तावित जागेला होणारा विरोध लक्षात घेता मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
22 23 जुलै 2021 रोजी आलेल्या महाप्रलयाच्या प्रसंगी नागरिकांना झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानी संदर्भात केलेल्या पाहणी दरम्यान सावित्री पुलावरील 2016 मध्ये क्षतीग्रस्त झालेला पूल व दादली पुलाचा बॉटल नेक म्हणून उल्लेख झाल्याचे सांगण्यात येते.
त्याचप्रमाणे दासगाव येथे असलेल्या कोकण रेल्वेचा पूल देखील या संदर्भातील अडचणीचा मोठा टप्पा ठरला असून यासंदर्भात आयआयटी मुंबई व संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या माहितीनंतर मागील चार वर्षापासून या ठिकाणी नागरिकांच्या असलेल्या मागणी संदर्भात महाराष्ट्र शासन केंद्र शासन व रेल्वे प्रशासन यंत्रणा यामध्ये अद्याप निर्णय न झाल्याने नागरिकांना या प्रश्नासंदर्भात देखील भविष्यकाळात तीव्र आंदोलन करावे लागेल असे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत.
महाड शहराला विणलेले खाडीपट्टा तसेच खेड दापोली मंडणगड या तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण पूल म्हणून दादली पुलाची निर्मिती तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या प्रयत्नातून सन 80_ 81 मध्ये झाली होती.
या पुलाला आता 40 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असून मागील काही वर्षात कोट्यावधी रुपये खर्च करून या पुलाची दुरुस्तीची कामे करण्यात आली होती मात्र ती दीर्घकाळ टिकू शकणार नसल्याने विद्यमान मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या विशेष प्रयत्नातून दादलीपुला नजीक सुमारे 200 मीटर अंतरावर नवीन पुलाची निर्मिती करण्याबाबत स्थानिक ग्रामस्थ पूर निवारण समिती यांच्यामार्फत मंत्री गोगावले यांच्याकडे या संदर्भात करण्यात आलेली मागणी त्यांनी तत्वतः मान्य केली.
याबाबत पूर्ण निवारण समितीमार्फत सातत्याने होत असलेल्या पाठपुरावा हा आगामी काळात महत्वपूर्ण ठरणार असून महाडकर नागरिकांसाठी महाप्रलय पासून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी तासगाव येथील कोकण रेल्वे चा ब्रिज व गाजली पुलाची नव्याने होणारी निर्मिती अस्तित्वात असलेल्या पुलापासून किमान 200 मीटर पश्चिमेकडे सरकवण्याचा आग्रह महाडकर नागरिकांकडून केला जात आहे.
एकूणच महाडच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी व पुढील पिढीच्या सुरक्षिततेसाठी शासनामार्फत मंजूर करण्यात आलेला हा प्रस्तावित दादलीचा पूल नागरिकांच्या मंजुरी प्रमाणेच 200 मीटर पश्चिमेकडे निर्माण करावा अन्यथा या पुलाच्या निर्मिती विरोधात महाडकर नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आल्याचे वृत्त शहरातील विविध भागात या संदर्भात केलेल्या विचारणे दरम्यान प्राप्त झाले आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित केलेल्या जागे ऐवजी नवीन 200 मीटर जागेवर निर्माण करावा अशी मागणी महाडकर नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मंत्री भरत शेठ गोगावले यांच्याकडे सर्वांचे लक्ष
महाडकरांची प्रातिनिधिक असणारी महाड पूर निवारण समिती मार्फत या पुलाच्या पश्चिमेकडील जागे संदर्भात दादली ग्रामस्थ बांधकाम विभागाचे अधिकारी औद्योगिक वसाहती मधील तत्कालीन अध्यक्ष संभाजी पठारे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत सद्यस्थितीमध्ये असलेल्या पुलापासून पश्चिम दिशेला 200 मीटर अंतरावर नवीन पूल उभारण्यात यावा असे ठरले होते. मात्र त्यानंतर बांधकाम विभागाकडून काढण्यात आलेल्या निवेदेमध्ये हा पूल 120 मीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले आहे.